आविष्कार देसाई
रायगड : जिल्ह्यातील आराेग्य कर्मचाऱ्यांना काेराेना लसीकरण करण्यास सुरुवात झाली आहे मात्र लसीमुळे शरीराला अपाय हाेईल या भीतीने फ्रंटलाइन वर्कर बॅकफूटवर येत आहेत. आम्हालाच गिनी पिग का बनवले जाते, आधी राजकीय क्षेत्रातील आमदार, खासदार, मंत्री यांनी लस टाेचून घ्यावी, असे बाेलले जात आहे.
रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार आराेग्य कर्मचारी, फ्रंटवर काम करणाऱ्यांनी काेराेना लसीकरणासाठी नाेंदणी केली आहे. त्यांना लस टाेचण्यास १६ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील चार लसीकरण केंद्रांवर १५४० पैकी ८०२ जणांना काेराेना लस टाेचण्यात आली आहे. त्यामध्ये अलिबाग जिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये ४०० पैकी १२३, उपजिल्हा रुग्णालय पेण ३८९ पैकी १८८, एमजीएम कामाेठे ४०० पैकी २७५ आणि येरला मेडिकल काॅलेज ३६ पैकी २१६ फ्रंटलाइन वर्कर्सनी लस घेतली.
लसीच्या सुरक्षिततेबाबत अनेकांना पडले विविध प्रश्न
मी स्वतः लस टाेचून घेतली आहे. मला काेणताच त्रास झाला नाही. लस पूर्णतः सुरक्षित आहे. नागरिकांनी त्याच्या सुरक्षिततेबाबत संशय बाळगण्याची गरज नाही. नागरिकांनी यासाठी पुढे आले पाहिजे. - डाॅ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक
लस घेण्यासाठी आमचीच निवड का करण्यात आली?लस आधी राजकीय क्षेत्रातील व्यक्तींनी घ्यावी. आमदार, खासदार, मंत्री हे फक्त लस सुरक्षित आहे. तुम्ही घ्या, असे सांगतात. त्यामुळे आधी तुम्ही घ्या म्हणजे नागरिकांचा तुमच्यावर विश्वास बसेल. - पाेलीस कर्मचारी
लस जरी सुरक्षित आहे असे मान्य केले तरी, लस नवीन असल्याने मनात भीती आहे. आराेग्य कर्मचाऱ्यांनाच गिनीपीग बनवले जात आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीची नाेंदणी करून त्यांना लस टाेचणे गरजेचे आहे. तेव्हा नागरिकांचा या लसीकरणावर विश्वास बसेल असे वाटते. - आराेग्य कर्मचारी
काेराेनाला हरवण्यासाठी आम्हीच पुढे हाेताे. काेराेना झालेल्यांना नातेवाईक झिडकारत हाेते, तेव्हा आम्हीच त्यांची सेवा केली. रुग्णांची सेवा करणे हे आमचे कर्तव्यच आहे, परंतु लसीकरणाचा प्रयाेग आमच्यावरच का केला जात आहे? त्यामुळे सरकारच्या हेतूबाबत संशयाला जागा आहे. - आराेग्य कर्मचारी
लस टाेचल्यानंतर काहींना मळमळ, डाेके जड हाेणे, अंगात बारीक ताप येणे अशा तक्रारी जाणवल्या आहेत. चारही केंद्रांपैकी एकाही केंद्रावर काेणत्याही आराेग्य कर्मचाऱ्याला माेठ्या प्रमाणात त्रास झालेला नाही, असा दावा आराेग्य यंत्रणेने केला असला तरी, जिल्ह्यात टार्गेटपैकी ५२ टक्केच कर्मचाऱ्यांनी लस टाेचली आहे.