आवक वाढल्याने फळांचा व्यवसाय तेजीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 11:09 PM2019-12-12T23:09:15+5:302019-12-12T23:09:37+5:30
मार्गशीर्ष महिन्यात व्रत व पूजा करताना पाच फळांची गरज असल्याने फळांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे.
माणगाव : माणगाव शहरांतील बाजारपेठेत फळांची आवक वाढल्याने फळ विक्रेत्यांचा व्यवसाय तेजीत आहे. मार्गशीर्ष महिन्यात फळांची आवक व विक्री वाढल्याने फळांचे दर स्थिर आहेत.
माणगाव बाजारपेठांमध्ये सफरचंद, डाळिंब, केळी, संत्री, मोसंबी, पेरू, पपई विविध प्रकारची फळे यांची आवक वाढली आहे. सातारा, पुणे जिल्ह्यातील व्यापारी माणगावमध्ये टेम्पो घेऊन येतात. त्यामुळे स्थानिक फळविक्रेते व परजिल्ह्यातील व्यापाऱ्यांमध्ये चुरस निर्माण झालेली दिसून येते. बाहेरून येणारे फळविक्रेते दोन-तीन दिवसांत विक्री करून मूळ गावी रवाना होतात. त्याच्याकडून वाजवी दरात फळे उपलब्ध होत असल्याने ग्राहकांमधूनही समाधान व्यक्त होते.
मार्गशीर्ष महिन्यात व्रत व पूजा करताना पाच फळांची गरज असल्याने फळांचा व्यवसाय सध्या तेजीत आहे. पाच फळे ही ५० रुपये दराने बाजारात विक्रीसाठी आहेत. सध्या सफरचंद १०० रुपये किलो, मोसंबी संत्री ८० रुपये किलो, तर चिकू ७५ रुपये किलो व केळी ४० रुपये डझन या भावाने बाजारात उपलब्ध आहेत. पूजेसाठी आवश्यक मनपसंतीची व उत्तम दर्जाची फळे या विक्रेत्यांकडून कमी दरात उपलब्ध होत असल्याने महिलावर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.