रोहा : रोह्यातील संकेत सदाशिव कुंभार याने फुल फेस फोल्डेबल व ॲडजस्टेबल मोटरसायकल हेल्मेट बनविले आहे. १५ आणि १६ डिसेंबर रोजी झालेल्या ऑनलाइन ‘अन्वेषण’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत त्याने बेसिक सायन्स विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. संकेत कुंभार हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथे तृतीय वर्ष यंत्र अभियांत्रिकी विभागात शिकत आहे.बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या हेल्मेटच्या समस्या लक्षात घेता त्याच्या असे लक्षात आले की, बरेच लोक हेल्मेट वापरणे टाळतात; त्यामुळे त्यांना अपघातांना सामोरे जावे लागते, तसेच पोलिसांच्या कारवाईलाही सामोरे जावे लागते. बाजारात उपलब्ध असणारे पारंपरिक हेल्मेट हे आकाराने मोठे असल्याने ते हाताळताना अनेक लोकांना त्रासदायक वाटते. तसेच पारंपरिक हेल्मेट हे विशिष्ट साईजमध्येच उपलब्ध असते. त्यामुळे हेल्मेट निवडताना अनेक लोकांचा गोंधळ उडतो किंवा हेल्मेट विकत घेतल्यानंतर काही काळानंतर ते सैल पडायला लागते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणून संकेतने फोल्डेबल व ॲडजस्टेबल हेल्मेट तयार केले आहे. तयार केलेले हेल्मेट हे अर्ध्या आकारात फोल्ड होत असल्यामुळे आपण ते बॅगमध्ये किंवा दुचाकीच्या डिक्कीमध्ये सहज घेऊन जाऊ शकतो. तसेच हे हेल्मेट दुचाकीवरसुद्धा अडकवण्याची आणि लॉक करण्याची सुविधा करण्यात आली आहे. या हेल्मेटच्या विशिष्ट रचनेमुळे हे हेल्मेट आपल्या डोक्याच्या आकारानुसार आपण ॲडजेस्ट करू शकतो. वापरकर्ते या हेल्मेटला ओपनफेस मोडमध्येसुद्धा वापरू शकतात. या हेल्मेटमध्ये दुचाकीस्वाराच्या सुरक्षिततेवर आणि आरामदायी वापरावर भर दिला आहे.या नवीन आविष्काराने विद्यापीठ पातळीवर प्रथम येत २०२० मध्ये ‘आविष्कार’ या राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत ‘बेस्ट इनोव्हेशन इन महाराष्ट्र’ हा पुरस्कार मिळवला होता. २० फेब्रुवारी रोजी मुंबई येथे झालेल्या ‘अन्वेषण’ संशोधन स्पर्धेत त्याची पश्चिम विभागातून देशपातळीवर निवड झाली होती. या स्पर्धेत भारतातील सर्व विद्यापीठांनी सहभाग नोंदविला होता. १५ आणि १६ डिसेंबर रोजी राजीव गांधी प्रौद्योगिकी विश्वविद्यालय, भोपाळ येथे एआययुतर्फे घेण्यात आलेल्या ‘अन्वेषण'' या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत त्याने बेसिक सायन्स विभागातून देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
संकेत कुंभारने बनवले फुल फेस फोल्डेबल, ॲडजस्टेबल हेल्मेट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2020 11:40 PM