४८ लाख बहिणींच्या खात्यात जमा झाला ३ हजार रुपयांचा सन्मान निधी; राज्यात १ कोटी ३५ लाख पात्र लाभार्थी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 04:55 PM2024-08-15T16:55:59+5:302024-08-15T16:56:15+5:30
महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांची माहिती.
लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने अंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींना जुलै आणि ऑगस्ट असे दोन महिन्याचा ३ हजार रुपयांचा सन्मान निधी खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील ४८ लाख बहिणींच्या खात्यात आतापर्यंत सन्मान निधी वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. २५ ते ३० लाख पात्र लाभार्थी बहिणीचे खात्याला आधार लिंक नसल्याने ते करून घ्यावे जेणेकरून त्यांनाही सन्मान निधी वितरीत केला जाईल असे आवाहनही तटकरे यांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग पोलीस मुख्यालय परेड मैदानावर मुख्य ध्वजरोहण सोहळा आटोपल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील पात्र लाभार्थी याना सन्मान निधी वितरीत करण्यास सुरुवात झाल्याचे ना. अदिती तटकरे यांनी माहिती दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्य शासनाने लागू केल्यानंतर विरोधकांकडून टीका टिप्पणी झाली होती. योजना लागू झाल्यानंतर राज्यातील बहिणीची तहसिल कार्यालयात गर्दी झाली होती. योजनेबद्दल अनेक टीका टिप्पणी होऊनही ती यशस्वीपणे राबविण्यात शासनाला यश आल्याचे दिसत आहे. रक्षाबंधन आधीच शासनाने बहिणींना दोन महिन्यांची ओवाळणी खात्यात जमा करण्यात सुरुवात केली आहे.
१ जुलै ते ३० जुलै या कालावधीत १ कोटी ४० लाखाहुन अधिक अर्ज विभागाकडे प्राप्त झाले होत. आलेल्या अर्जाची पडताळणी करून १ कोटी ३५ लाख पात्र लाभार्थी अर्ज मंजूर झाले. एक कोटीहून अधिक लाभार्थी असल्याने तांत्रिक बाबी तपासून घेणे गरजेचे असते. एकाच दिवशी डीबीटी न करता टप्प्याटप्प्याने निधी वितरण सुरू केले. १४ ऑगस्ट रोजी ३२ लाख लाभार्थी याच्या खात्यात सन्मान निधी वितरीत करण्यात आला आहे. १५ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे चार वाजता दुसरी प्रक्रिया करून एकूण ४८ लाख लाभार्थींच्या खात्यात दोन महिन्याचे प्रत्येकी तीन हजार रुपये जमा केले असल्याचे महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली.
खात्याला आधार लिंक झाल्यानंतर होणार पैसे जमा
सव्वा लाख पात्र योजनेतील लाभार्थी पैकी २५ ते ३० लाख लाभार्थी महिलांचे खाते आधारकार्डशी सलग्न नसल्याने त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. ज्यांचे खाते आधार कार्ड बरोबर लिंक नाहीत त्यांनी ती त्वरित करून घ्या. जेणेकरून सन्मान निधी वितरित होईल. याबाबत जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या असल्याचे ना तटकरे यांनी म्हटले आहे.
१७ ऑगस्ट ला राज्यस्तरीय कार्यक्रम बालेवाडीत
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम हा १७ ऑगस्ट रोजी पुणे येथील बालेवाडी येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक १० लाख लाभार्थी आहेत. याच दिवशी जिल्हा स्तरावर पालकमंत्री यांच्या उपस्थितीत मुख्यालयी ठिकाणीही कार्यक्रम होणार आहे. राज्यस्तरीय कार्यक्रम हा लाईव्ह असणार आहे. असे अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.