नांदगाव : मुरुड तालुक्यातील भोईघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये फणसाड धरण आहे. गेल्या काही दिवसांपासून फणसाड धरणातील मेन गेटव्हॉल्वचा रॉड खराब झाल्याने लाखो लिटर पिण्याचे पाणी वाया गेले होते. त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या २४ गावांना भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. या समस्येसंदर्भात या गावातील काही प्रमुख शिष्टमंडळाने आमदार पंडित पाटील यांची भेट घेवून व्हॉल्व दुरुस्ती व धरणात साचलेला गाळ उपसण्याची मागणी केली होती. याबाबत आमदार पंडित पाटील यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना पत्र लिहून व्हॉल्व दुरुस्ती व गाळ उपसण्यासाठी प्रत्यक्ष भेटून तातडीचा निधी मिळण्याची मागणी केली होती. येथील परिस्थितीचे जलसंपदा मंत्री महाजन यांनी अवलोकन करून फणसाड धरणाच्या दुरुस्तीसाठी तातडीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे लवकर फणसाड धरणाच्या मेन गेट व्हॉल्वच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्याची माहिती आ. पंडित पाटील यांनी दिली. धरणाचे काम झाल्यानंतर पुढील वर्षी मुबलक पाणी मिळेल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. (वार्ताहर)
फणसाड धरणासाठी निधी मंजूर
By admin | Published: June 08, 2015 4:20 AM