जिल्ह्यात २०० स्वच्छतागृहांसाठी निधी देणार
By admin | Published: January 28, 2017 02:54 AM2017-01-28T02:54:52+5:302017-01-28T02:54:52+5:30
भारत सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात योगदान देण्यासाठी लायन्स क्लब उत्सुक असून, सरकारच्या सोबत राहून
अलिबाग : भारत सरकारने सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानात योगदान देण्यासाठी लायन्स क्लब उत्सुक असून, सरकारच्या सोबत राहून स्वच्छ भारत अभियानांतर्गत सहभाग नोंदविण्यासाठी २०० स्वच्छतागृहे उभारण्यासाठी निधी देणार असल्याची घोषणा लायन्स क्लब इंडियाचे अध्यक्ष सुभाष भलवाल यांनी केली.
लायन्स क्लब अलिबागच्या वतीने अलिबागच्या निसर्गरम्य समुद्रकिनारी लायन्स अलिबाग फेस्टिव्हल-२०१७ चे आयोजन करण्यात आले आहे. चार दिवस चालणाऱ्या या फेस्टिव्हलचे उद्घाटन बुधवारी रात्री सात वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी व्यासपीठावर टीव्ही कलाकार आशा शेलार, अलिबागचे आमदार पंडित पाटील, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, पी.एन.पी.च्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, आरडीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, अॅड. आस्वाद पाटील, अलिबाग लायन्स क्लबचे अध्यक्ष नयन कवळे आदी मान्यवर उपस्थित होते. लायन्स क्लब अलिबागने निश्चितपणे ग्रामीण भागातील जनतेच्या सामाजिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी प्रामुख्याने आरोग्य शिबिरे, शैक्षणिक शिबिरे घेतली जात आहेत. स्पर्धात्मक युगात लायन्स क्लबने आपले नाव यशोशिखरावर नेले आहे. लायन्स क्लबने आपली व्याप्ती अधिक वाढवून आता युवा पिढीला लायन्स क्लबने सदस्यत्व द्यायला हवे. तसे केल्यास लायन्सचे सुरू असलेले सामाजिक उपक्र म अधिकपणे समाजात पोहचविण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पी.एन.पी. संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी केले.
लायन्स क्लब अलिबागने सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी ४२ वर्षे यशस्वी पूर्ण केली आहेत. सलग ११ वर्षे लायन्स अलिबाग फेस्टिव्हलचे आयोजन केले जात आहे. बदलत्या काळानुसार लायन्स क्लबने आता सामाजिक उपक्र मांची व्याप्ती वाढवून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचायला हवे यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक सहकार्य करेलच, त्याचबरोबर अलिबाग न.प.च्या सोबतीने अनेक वेगळे उपक्र म राबविता येतील, असे रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी सूचित केले.