रायगडातील महड, पाली येथील गणपती मंदिरांना मिळणार झळाली
By निखिल म्हात्रे | Published: December 28, 2022 06:06 PM2022-12-28T18:06:46+5:302022-12-28T18:07:48+5:30
रायगडातील महड, पाली येथील गणपती मंदिरांच्या विकासकामांसाठी निधी मिळाला आहे.
अलिबाग : अष्टविनायक गणपतींपैकी दोन गणपती देवस्थाने रायगड जिल्ह्यात आहेत. त्या ठिकाणी सुशोभीकरण आणि विविध विकासकामे करण्यासाठी अष्टविनायक गणपती विकासासाठी सुमारे 28 कोटी 86 लाख 5617 रुपयांचा निधीचा आराखडा मंजूर झाला असल्याची माहीती जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी दिली. नववर्षात रायगडच्या भक्तांना हे एक मोठ गिफ्ट मिळाले असल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अष्टविनायक गणपती देवस्थानांमध्ये महडचा वरद विनायक आणि पालिका बल्लाळेश्वर हे गणपती देवस्थान मंदिरे रायगड जिल्ह्यात आहेत. या मंदिर परिसर आणि आसपासच्या परिसरातील रस्ते, स्वच्छतागृहे, विद्युतीकरण, सभागृहे आदी प्रस्तावित विविध विकासकामांना अष्टविनायक मंदिर जिर्णोध्दार योजनेतून मंजूरी मिळाली आहे. त्यासाठी एकूण 28 कोटी 86 लाख 5617 रुपयांचा निधी खर्च होणार आहे. ही योजना राबिण्यासाठी त्यावेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधींसह देवस्थानचे विश्वस्त, पंचायत समिती सदस्यांच्या सूचना घेऊन प्रांताधिकारी स्तरावर बैठका घेऊन त्या सूचनांचा या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे.
पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराची दृश्यमानता वाढवणे व प्रवेश अधिक रुंद करणे, पाणपोई व दुकाने, शेजारील इमारती काढून तिथे पायऱ्यांची व दर्शनवारीची व्यवस्था करणे, जेणेकरून रुग्णचिकित्साकेंद्राकडून येणारी वाट रुंद होईल. धूंडी विनायक मंदिराची वास्तुशैली अनुरूप बांधणी, मंदिराच्या दोन्ही बाजूला लावलेली छते काढून मूळ मंदिराची दृश्यमानता वाढवणे. मंदिराचा मंडप व नगारखान्यावरील छताची दुरुस्ती. दर्शन रांग, बसण्यासाठी जागा, फरशा (मंदिर व परिसरात), माहिती फलक, विद्युतीकरण, कुंडाची साफसफाई व दुरुस्ती, नवीन प्रवेशकमान अशी नविन प्रस्तावित विकास कामे होणार असल्याचे जिल्हाधिकारी डाॅ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले. अष्टविनायकांच्या मंदिरांशी सुसंगत असे वरदविनायक मंदिराचे बांधकाम प्रस्तावित आहे. या मंदिराचे छत कौलारू असणार आहे. यामध्ये दर्शन रांग, बसण्यासाठी जागा, पदपथ, माहिती फलक, विद्युतीकरण, तळ्याची साफसफाई, दीपमाळ दुरुस्ती आणि स्वच्छता करणे आदी कामे होणार आहेत.