नेरळ : नेरळ जवळ धामोते-बोपेले हद्दीत हुतात्मा हिराजी पाटील सामाजिक भवन असून या सभागृहाचे पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी आणि बांधकाम केलेल्या सभागृहाचे सुशोभीकरण करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेने ३५ लाखांचा निधी दिला आहे. कामाचे कार्यादेश रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास संकुल प्राधिकरणने दिले आहेत. दरम्यान, लोकवस्ती वाढल्याने एकमजली सभागृहात जागा अपुरी पडत होती आणि त्यामुळे तेथे अतिरिक्त कामे करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते.
कर्जत तालुक्यातील मानिवली गावचे हुतात्मे हिराजी गोमाजी पाटील यांना २ जानेवारी १९४३ रोजी ब्रिटिश पोलिसांविरुद्ध लढताना वीरमरण प्राप्त आले होते. त्यांच्या नावाने मानिवली गावात राज्य शासनाच्या वतीने हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आहे. तर कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या वतीने नेरळ रेल्वे स्टेशन पासून ६०० मीटरच्या अंतरावर धामोते-बोपेले गावाच्या हद्दीत सामाजिक भवन बांधण्यात आले आहे. त्या सामाजिक भवनात तळमजल्यावर सभागृह असून सर्व जाती धर्मातील लोकांचे आनंद सोहळे तेथे साजरे होतात. मागील वर्षांत झपाट्याने लोकसंख्या वाढत असून त्या सभागृहात जागा अपुरी पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन कर्जत तालुका आगरी समाज संघटना त्या ठिकाणी पहिल्या मजल्याचे बांधकाम व्हावे, यासाठी निधी संकलन करीत आहे. संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील, सभागृहाच्या कामासाठी निधी मिळावा यासाठी रायगड जिल्हा परिषदेकडे सातत्याने प्रयत्न करीत होते. रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष या पदावर असताना अॅड. आस्वाद पाटील हे हुतात्मा हिराजी पाटील सभागृहात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्या वेळी त्यांनी हॉलच्या सुशोभीकरण कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. आस्वाद पाटील यांनी आश्वासन दिले, तरी निधी लवकरात लवकर मिळावा यासाठी कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण पाटील पाठपुरावा करीत होते. निधी दिल्याबद्दल संघटनेचे अध्यक्ष सावळाराम जाधव यांनी जिल्हा परिषदेचे आभार मानले.निविदा प्रक्रिया पूर्णडिसेंबर २०१९ मध्ये रायगड जिल्हा परिषदेने पहिल्या मजल्याचे बांधकाम करणे आणि सुशोभीकरण करणे, या कामांसाठी निधी वर्ग करण्यात आला होता. नेरळ-ममदापूर विकास संकुल प्राधिकरणाकडून ३५ लाखांच्या निधीमधून दोन कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्या कामांची अंदाजपत्रके, आॅनलाइन निविदा प्रक्रिया या सर्व पूर्ण झाल्या आहेत.पहिल्या मजल्याचे बांधकाम करण्यासाठी १९.९८ लाख तर त्या सभागृहाचे सुशोभीकरण करण्यासाठी १४.९८ लाख रुपये मंजूर असून त्या दोन्ही कामांचे कार्यादेश रायगड जिल्हा परिषदेने २८ एप्रिल रोजी दिले आहेत. ही दोन्ही कामे पूर्ण करण्यासाठी कामाची निविदा भरणारे अभियंता जयेश कालेकर यांना सहा महिन्यांचा अवधी आहे.