मोबाइल टॉर्चवर करावे लागत आहेत अंत्यविधी; कल्हे गावातील स्मशानभूमीत गैरसाेय
By वैभव गायकर | Published: January 8, 2024 10:00 AM2024-01-08T10:00:21+5:302024-01-08T10:00:45+5:30
स्मशानभूमीत रात्री अंधार होता. पुरेशा उजेडाअभावी ग्रामस्थांनी मोबाइलचे टॉर्च सुरू केले
वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल: पनवेलमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ येत असताना, ग्रामीण भागात मात्र प्राथमिक सुविधांचा अभाव आहे. कर्नाळामधील कल्हे गावातील स्मशानभूमीत पुरेसा उजेड नसल्याने, चक्क मोबाइलच्या टॉर्चवर अंत्यविधी पार पाडावा लागला. मोहिनी चव्हाण (६०) यांचे शनिवारी निधन झाले. स्मशानभूमीत रात्री अंधार होता. पुरेशा उजेडाअभावी ग्रामस्थांनी मोबाइलचे टॉर्च सुरू केले. सरण सोडले, तर येथे काहीच सुविधा नाही. अशा परिस्थितीतच अंत्यसंस्कार करावे लागतात, हे दुर्दैवी असल्याचे मोहिनी चव्हाण यांचे पुत्र मोहन चव्हाण यांनी सांगितले.
स्मशानभूमीची दुरवस्था
- आमच्या बाबतीत झालेल्या या प्रसंगाची पुनरावृत्ती नको, म्हणून शासनाने याबाबत याेग्य पावले उचलावीत, अशी मागणी मोहन चव्हाण यांनी यावेळी केली.
- पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात स्मशानभूमींची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. काही ठिकाणी स्थानिक ग्रामपंचायतींनी निधीअभावी, तर काही स्मशानभूमीत जागेच्या वादामुळे अडचणी आहेत. प्रशासनाचे याकडे लक्ष नाही.
- याबाबत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय भोये यांच्याशी संपर्क साधण्याच्या प्रयत्न केला असता, मात्र तो होऊ शकला नाही.