राजू भिसे ।नागोठणे : शहरात एका लाकडाच्या गोदामाला बुधवारी रात्री भीषण आग लागून पत्र्याच्या दोन्ही शेडसह आतमध्ये लाकडाच्या मालासह इतर साहित्य जळून खाक झाले. विविध ठिकाणांहून आलेल्या अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी चार तासांचा अवधी लागला. आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून, पोलीस निरीक्षक पी. बी. गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज मोरे पुढील तपास करीत आहेत.नागोठणे येथील प्रभुआळीत राहणारे सीताराम सीतापराव यांचे नागोठणे-पेण मार्गावर नारायण सॉ मिल समोर लाकडाचे गोदाम आहे. या ठिकाणी प्रत्येकी १६०० चौ. फुटांच्या पत्र्याच्या दोन शेड असून, येथे लाकडाच्या प्लेट करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. रात्री शेड बंद केल्यानंतर १० वाजण्याच्या दरम्यान शेडच्या आतून धूर येत असल्याचे शेजारच्यांना निदर्शनास आल्यानंतर तातडीने सीतापराव कुटुंबीयांस कळविण्यात आले. शेडचा दरवाजा उघडून आतील फोर्क लिफ्ट, हे वाहन बाहेर काढण्यात आल्यानंतर इतर साहित्य बाहेर काढताना आगीने रौद्ररूप धारण केल्याने पोलिसांना कळवून येथील रिलायन्स कंपनीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.अग्निशमन दल येईपर्यंत संपूर्ण गोदामाला आगीने वेढले होते. आगीचा पसारा वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने सुप्रीम पेट्रोकेम, तसेच रोहे नगरपरिषदेच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे १६ बंब वापरण्यात येऊन साडेचार तासांच्या अथक प्रयत्नानंतर मध्यरात्री २.३० वाजता आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.
नागोठण्यात भीषण आग; १२ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 6:09 AM