पनवेलमध्ये सामाजिक अंतराचा फज्जा; कोरोनाबाबतचे प्रशासनाचे नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:24 AM2020-11-30T00:24:32+5:302020-11-30T00:24:42+5:30
मास्कचा वापर अयोग्य, ८० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक मास्कचा वापर करीत आहेत. मात्र हा मास्क योग्यरीत्या वापरला जात नाही
वैभव गायकर
पनवेल : राज्यभरात दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसून येत आहे. पनवेल महानगरपालिकेने साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार नागरिकांना विविध नियमावली घालून दिली आहे. कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आदींसह विनाकारण घराबाहेर न पडण्याच्या सूचना देऊनही नागरिकांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसते आहे. त्यामुळे पनवेल पालिका क्षेत्रातील नागरिकांना प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांची भीतीच नसल्याचे चित्र आहे.
पालिका क्षेत्रातील खारघर, कामोठे कळंबोली, पनवेल आदी ठिकाणच्या परिसरातील नागरिक सर्रास पनवेल महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या सूचना पायदळी तुडवत असल्याचे चित्र रिॲलिटी चेक दरम्यान दिसून आले.
८० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिक मास्कचा वापर करीत आहेत. मात्र हा मास्क योग्यरीत्या वापरला जात नाही, असे दिसले. हा मास्क तसाच गळ्यात अडकवलेला अथवा हनुवटीवर ठेवलेला दिसून येत आहे. शहरातील दुकानदारही याचप्रकारे मास्कचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेषतः उघड्यावर थुंकणे, मास्कचा वापर टाळणे अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन नागरिक उघडपणे करीत आहेत. याशिवाय बाजारात होणारी गर्दी डोकेदुखी ठरली आङे. प्रशासनाची भीती नागरिकांना नसल्याने हे प्रकार घडत आहेत. सामाजिक अंतराचा मोठ्या प्रमाणात फज्जा उडाल्याचे दिसते आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोविडच्या रुग्णांचा आकडा २५ हजार ३७४ पर्यंत पोहोचला आहे. यापैकी २४ हजार १२१ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत, तर ५७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पालिका प्रशासन कोविडबाबत सर्वतोपरी उपाययोजना राबवून साथ नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीदेखील कोविडचे गांभीर्य लक्षात घेता स्वतःहून शासनाच्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. - सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महानगरपालिका
नागरिकांनी स्वत:हून नियमांचे पालन करावे
पालिकेकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जात आहे. मात्र सातत्य नसल्याने नागरिक कोविडबाबत नियमांचे पालन करण्यास उदासीन आहेत. पालिका क्षेत्रातील लोकसंख्येच्या मानाने व प्रशासनातील मनुष्यबळाच्या अभावामुळे प्रत्येक ठिकाणी पालिका कर्मचाऱ्यांना पोहोचणे शक्य नाही.