गॅस अपहार प्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 02:09 AM2017-07-29T02:09:24+5:302017-07-29T02:09:27+5:30
मुंबईतील चेंबूर परिसरातील गॅस कंपनीतून लिक्वीड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) टॅँकरमधून घेऊन अलिबाग तालुक्यातील साळाव येथील गॅस बॉटलिंग प्लॅन्टमध्ये पोहोच करण्याकरिता दिला असता
विशेष प्रतिनिधी
अलिबाग : मुंबईतील चेंबूर परिसरातील गॅस कंपनीतून लिक्वीड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) टॅँकरमधून घेऊन अलिबाग तालुक्यातील साळाव येथील गॅस बॉटलिंग प्लॅन्टमध्ये पोहोच करण्याकरिता दिला असता, तो वाटेतच पुणे जिल्ह्यातील मंचर येथील एलपीजी पंप चालकास विकणारा टॅँकरचालक राम गुंडाजी एचे (रा. लातूर), चेंबूरमधील गॅस कंपनीतील मध्यस्त रॉबर्ट जॉन मायकल आणि मंचर येथील एलपीजी पंपचालक किरण गुलाब सैद या तिघांवर गुन्हा दाखल झाल्यापासून केवळ तीन दिवसांत मुद्देमालासह अटक करण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे.
१८ जुलै रोजी दुपारी ४ ते २१ जुलै रोजी दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान टँकरचालक राम गुंडाजी एचे याने त्याच्या ताब्यात असलेला टँकर न. एमएच-४३/वाय-२६९२मध्ये चेंबूर येथील गॅस कंपनीमधून १७ हजार ५८० किलो वजनाचा एलपीजी गॅस भरून अलिबाग तालुक्यातील उसर येथील गॅस कंपनीमध्ये पोहोच करण्याकरिता दिला होता. मात्र, चालक राम गुंडाजी एचे याने चेंबूरमधील गॅस कंपनीतील मध्यस्त रॉबर्ट जॉन मायकल यांच्याशी आपसात संगनमत करून, यापैकी ३ हजार किलो एलपीजी गॅस पुणे जिल्ह्यातील मंचर येथील गॅस पंपचालक किरण गुलाब सैद यांस विकला. त्यानंतर चालक राम गुंडाजी एचे याने या टँकरमध्ये पाणी भरून, पाणीमिश्रित एलपीजी गॅस उसर येथील गॅस कंपनीत जमा करण्यासाठी आणला.
रेवदंडा पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक एन. डी. सस्ते यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने या प्रकरणातील तिघांना अटक के ली.