लोकमत न्यूज नेटवर्क, पेण: मूर्तिकलेच्या माहेरघरातून गणेशमूर्तींची परदेशवारीची या वर्षातील पाचवी खेप गुरुवारी पेणमधून रवाना झाली. पाच हजार लहान-मोठ्या मूर्ती या खेपेत कॅनडा व अमेरिकेत पाठवल्याचे दीपक कला केंद्राचे मालक मूर्तिकार सचिन आणि नीलेश समेळ यांनी सांगितले.
परदेशातील अनिवासी भारतीय गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यासाठी ते मूर्तिकलेचे माहेरघर असलेल्या पेण शहरातूनच गणेशमूर्ती मागवतात. एकदा का पाऊस सुरू झाला की वादळवारे व समुद्र खवळलेल्या स्थितीत मूर्ती पाठवता येत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वीच ही ऑर्डर पूर्ण करावी लागते. दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी ते मे अखेरपर्यंत ही मागणी नोंदविली जाते. त्यानंतर पंधरा दिवसांनी ही ऑर्डर पोहोचवण्यासाठी कार्यशाळेत नियोजनपूर्वक काम सुरू केले जाते. यावर्षी वस्त्र प्रावरणांनी सजलेल्या गणेशमूर्तींना परदेशातील गणेशभक्तांकडून मोठी मागणी होती. कुशल कामगारांच्या अभावी ती पूर्ण करताना येथील मूर्तिकारांना मोठी कसरत करावी लागते.
- आतापर्यंत येथे पाठवल्या मूर्ती
याअगोदर लंडन, सिंगापूर, बँकाक, आस्ट्रेलिया, मलेशिया, थायलंड व अमेरिका या देशात चार ऑर्डर पाठवण्यात आल्या आहेत. गुरुवारी पाच हजार गणेशमूर्ती बॉक्स पॅकिंगसह पाठवण्यात आल्या. एक ते चार फूट आणि मोठ्या दहा फुटांच्या सहा मूर्तींचा यात समावेश आहे.या वर्षी तब्बल ३० हजार गणेशमूर्ती परदेशात रवाना झाल्या आहेत. पंधरा दिवसांनी आणखी एक खेप होणार आहे. अमेरिकेत सर्वाधिक मूर्ती गेल्या आहेत. इको-फ्रेंडली पर्यावरणपूरक मूर्ती पाठवण्यात आल्या आहेत.- नीलेश समेळ, मूर्तिकार, दीपक कला केंद्र, पेण.