नेरळ : ढोल-ताशांचा गजर आणि टाळ मृदंगाचा भक्तिमय संगम, फटाक्यांची आतषबाजी व ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणरायाचे मंगळवारी नेरळ येथील गणेश घाटावर भाविकांनी भक्तिमय वातावरणात निरोप दिला. गणेश घाटावर गणरायाचे विसर्जन करतानाच गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..., गणपती गेले गावाला... चैन पडेना आम्हाला! असा जयघोष करीत भाविकांनी पुढल्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण दिले आहे.नेरळ येथील गणेश घाटावर नेरळमधील घरगुती आणि सार्वजनिक गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यावेळी घरगुती ६३३ आणि एका सार्वजनिक मंडळाच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने गणेश घाटावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. सुमती चिंतामणी टिपणीस महाविद्यालयाचे विद्यार्थी निर्माल्य आणि प्लास्टिक गणेशभक्तांकडून जमा करून स्वच्छता मोहीम राबवित होते, तर नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी गणेश घाटावर आलेल्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांना सहकार्य करीत होते. या गणपती विसर्जन सोहळ्याला नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सुवर्णा नाईक, उपसरपंच अंकुश शेळके, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा परिषद सदस्या अनसूया पादिर, कर्जत पंचायत समिती सदस्या सुजाता मनवे आदींसह विविध राजकीय पक्षातील, सामाजिक संस्थांतील पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विसर्जन सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रकाश राठोड आणि दिलीप बोरसे यांनी केले.अलिबागमध्ये पोलिसांच्या बाप्पाचे विसर्जनगणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी नेहमीच खाकी वर्दीमध्ये दिसणारे पोलीस बुधवारी झब्बा-कुडता आणि डोक्यावर तुर्रेदार फेटा अशा पारंपरिक वेशभूषेमध्ये दिसले. निमित्त होते ते रायगड पोलिसांच्या गणपती बाप्पाच्या विर्सजनाचे. ढोल-ताशांच्या गजरामध्ये रायगड पोलिसांनी गणरायाला निरोप दिला.अनंत चतुर्दशीच्या दिवशी रायगड जिल्ह्यामध्ये नागरिकांनी बाप्पाला निरोप दिला. त्यावेळी रायगड पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. रायगड पोलिसांनीही पोलीस परेड मैदानावर गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली होती. जिल्ह्यातील तमाम बाप्पाच्या मूर्तींचे शांततेमध्ये विसर्जन व्हावे, यासाठी जिल्ह्यातील पोलीस बंदोबस्तामध्ये व्यस्त होते. त्यामुळे त्यांना त्यांच्या बाप्पाचे विसर्जनच करता आले नाही. जनतेने केलेल्या विसर्जनानंतर पोलिसांच्या गणपतींचे विसर्जन करायची प्रथा तशी जुनी आहे.पोलिसांच्या गणपतीच्या विसर्जनाला सकाळी अकरा वाजता सुरु वात झाली. पोलीस परेड मैदानावर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी लेझीम खेळत विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. पोलिसांनी पांढरा झब्बा-कुडता आणि डोक्यावर तुर्रेदार फेटा असा पारंपरिक पोषाख परिधान केला होता. त्यामुळे अलिबागकर चांगलेच अवाक् झाले. पोलिसांच्या शिस्तबध्द मिरवणुकीचे जनतेने कौतुकही केले.बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलिसांनी रथ सजवला होता. त्याच्या जोडीला ढोल-ताशांचा गजर, नाशिक बँड, कर्नाटकी वाद्य, पारंपरिक कोळी नृत्य, पारंपरिक भरतनाट्यम नृत्य, जनजागृती पथनाट्य असा सर्वच कलांचा एकाच ठिकाणी मिलाप झाल्याचे दिसून आले. अलिबाग येथील पोलीस लाइनमधील गणपतीला घोषणांचा जयजयकार करीत भावपूर्ण निरोप देण्यात आला. ही मिरवणूक पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती. मिरवणुकीला निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील सहभागी झाले होते.
गणपती गेले गावाला... चैन पडेना आम्हाला! भावपूर्ण वातावरणात बाप्पाला निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 2:42 AM