पेण : अधिक मास समाप्तीनंतर संपूर्ण महाराष्ट्र श्री विठ्ठलाच्या भक्तिरसात तुडूंब न्हाऊन निघालाय. २७ जुलै, आषाढीनंतर श्रींच्या दर्शनमात्रे हा भक्तिरसांचा सोहळा शांत होणार असला तरी पुन्हा एकदा भेटी लागी जीवा... लागलीसे आस, मात्र ही आस विघ्नहर्त्या श्री गणेशाची लागणार आहे. बाप्पाच्या आगमनाचे वेध सर्वांनाच लागले आहेत. या भेटीसाठी विदेशातील बाप्पाच्या फॅन्सची एन्ट्री थेट पेणनगरीत झाली आहे. बँकॉक, थायलंडच्या गणेशभक्तांची पावले पेणमधील दीपक कलाकेंद्रात दाखल झाली असून थाई कलाविष्कारातील बाप्पाचं रूप आणि भारतीय कलाविष्कारातील तब्बल दोन ते चार फूट उंचीच्या २५ गणेशमूर्ती खरेदी करून विदेशी फॅन्स बँकॉक, थायलंडला रवाना देखील झाले.थायलंडची थाई कलाविष्कारातील बालगणेशमूर्ती घेऊन ते पेणनगरीत आले, पेणच्या मूर्तिकलेची ख्याती व सुबक गणेशमूर्ती जगाला परिचित असल्याने बँकॉक-मुंबई असा थेट विमानप्रवास करून सांताक्रुझ विमानतळावरून गाईडच्या सहाय्याने ते पेणला आले. यावेळी विदेशी पाहुण्यांचा दोन दिवस पाहुणचार करून थाई कलेतील गणेशमूर्ती बनविण्याचा संकल्प दीपक कलाकेंद्राने केला आहे. थाई कलेतील बाळ गणेश व त्यांच्या पोझेसनुसार मूर्तीची रचना पुढील वर्षीच्या गणेशोत्सवासाठी केली जाईल, असे कला केंद्राच्या सूत्रांनी सांगितले. मात्र आलेल्या सहा विदेशी फॅन्सना भारतीय कलेतील गणेशमूर्ती भावल्या. त्यांनी २५ गणेशमूर्ती खरेदी करून शनिवारी बँकॉक व थायलंड येथे रवाना देखील झाल्या. श्रीगणेशाच्या उत्सवाच्या लगबगीच्या ओढीने आता साऱ्याच गणेशभक्तांची पावले पेणच्या कार्यशाळांमध्ये पडू लागलीच. यावर्षी पर्जन्यमान कमी असल्याने मूर्तीच्या वितरण व्यवस्थेत सर्व काही मूर्तिकारांच्या पथ्यावर पडत आहे. सध्या पाऊस गायब झाल्याने बाप्पाच्या मूर्तीचं रंगकाम, पॅकिंग व मूर्ती वाहून नेणारे टेम्पो, गाड्यांचे वेळापत्रक सुरळीत असल्याचे मूर्तीकारांची यावेळी सांगितले.
पेणच्या कार्यशाळेत बँकॉक, थायलंडचे गणेशभक्त
By admin | Published: July 19, 2015 12:00 AM