अलिबाग - तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून वेश्वी ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे थेट सरपंच पदाचे विजयी उमेदवारी गणेश गावडे यांनी आज पदभार स्वीकारला. उसरपंच पदावर शेकापच्या आरती पाटील यांची निवड झाली.
अलिबाग तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा वेश्वी ग्रामपंचायतीची निवडणूक 16 ऑक्टोबर रोजी होऊन 17 ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर झाला होता. या निवडणुकीमध्ये थेटसरपंच पदावर ग्रामविकास परिवर्तन आघाडीचे उमेदवार गणेश गावडे विजयी झाले आहेत. तर एकूण 11 सदस्यांपैकी सात सदस्य हे शेकापचे तर चार सदस्य आघाडीचे विजय झाले होते.
शुक्रवारी (11 नोव्हेंबर) आघाडीचे विजयी उमदेवार गणेश भालचंद्र गावडे यांनी आपल्या सरपंच पदाचा पदभार स्वीकारला. तर उपसरपंच पदासाठी सरपंच गणेश गावडे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. उपसरपंच पदासाठी शेकापतर्फे आरती प्रफुल्ल पाटील तर आघाडीकडून उद्धव भितळे यांचे उमेदवारी अर्ज दाखल होते. यावेळी झालेल्या निवडीत आरती पाटील यांनी सात तर उद्धव भितळे यांनी पाच मते मिळाल्याने उपसरपंच पदावर आरती पाटील यांची निवड झाली. यावेळी निवडणूक निरीक्षक म्हणून राजीव डोंगरे यांनी काम पाहिले. तर ग्रामविस्तार अधिकारी सुदेश राऊत यांनी ही प्रक्रीया पार पाडली. तत्पूर्वी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी यांनी येथे उपस्थित राहून नवनिर्वाचित सरपंच गणेश गावडे यांना शुभेच्छ्या दिल्या.