गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये रंगकामाला वेग
By admin | Published: July 28, 2016 03:02 AM2016-07-28T03:02:43+5:302016-07-28T03:02:43+5:30
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आबालवृध्दांचा लाडका बाप्पा ५ सप्टेंबर रोजी घराघरात अवतरणार आहे. बाप्पांच्या प्रतीक्षेची आस जशी सर्वांनाच आहे. त्या बाप्पांच्या मूर्तीच्या
- दत्ता म्हात्रे, पेण
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आबालवृध्दांचा लाडका बाप्पा ५ सप्टेंबर रोजी घराघरात अवतरणार आहे. बाप्पांच्या प्रतीक्षेची आस जशी सर्वांनाच आहे. त्या बाप्पांच्या मूर्तीच्या रंगकामांना सध्या पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये वेग घेतला असून बाप्पांचे निर्माते तथा मूर्तिकार आपल्या कार्यशाळांच्या आॅर्डर पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र रंगकामावर भर देत आहेत. पेणच्या कलाग्राम हमरापूर-जोहे-कळवे या नगरीत सध्या कच्च्या मूर्तींची मागणी प्रचंड वाढली असून या ग्रामीण परिसरात १० लाख छोट्या-मोठ्या तर शहरात ८ लाख मिळून १८ लाख गणेशमूर्तींचे निर्माण पेणच्या कार्यशाळांमधून झाले असून १० हजार कामगारांचा राबता आॅगस्ट अखेरपर्यंत कायम राहणार आहे.
मुंबईत जागेअभावी गणेशमूर्तींची विक्री व गाळ्याचे भाडे मूर्तिकारांना डोईजड ठरते. येत्या ४० दिवसात हा व्यवसाय पूर्ण होणार असल्याने त्याची मेगा तयारी पेणच्या सर्वच कार्यशाळांमधून सुरू आहे. शाडूच्या मूर्ती व प्लॅस्टर आॅफ पॅरिस अशा दोन्ही प्रकारातील मूर्ती पेणच्या कार्यशाळांमध्ये तयार आहेत. यावर्षीचा महागाईचा निर्देशांक चढता असल्याने त्या परिणाम स्वरूप बाप्पांच्या मूर्तींमध्ये तब्बल १५ टक्के वाढ होणार आहे. यामध्ये शाडूची माती २० टक्क्यांनी वाढली, २५० ची गोण ३५० रुपये झाली. १०० रुपये प्रति गोण वाढल्याने ३५ किलोच्या गोणीत एक फुटाचे चार बाप्पा तयार होतात. काथ्याचा भाव ९०० रुपयांवरून १२०० रुपये, मजुरीचे दरही १५ टक्के वाढले. रंग, माती, प्लॅस्टर, मजुरी व दळणवळण, वीजबिल यासर्व बाबी जमेस धरून यावर्षीची महागाई पाहता बाप्पांच्या प्रतिमूर्तीमध्ये १५ टक्के वाढ अपेक्षित असल्याचे कार्यशाळांच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.