पेण - गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मूर्तिकलेचे माहेरघर असलेल्या पेणमध्ये सुमारे पाच लाख गणेशमूर्तींची नोंदणी झाली. या नोंदणीमुळे मूर्तिकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या तालुक्यात दरवर्षी ३५ लाखांपेक्षा अधिक मूर्तींची विक्री करण्यात येते.
गेल्या काही महिन्यांपासून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीच्या बंदीचा विषय चर्चेत असल्याने याबाबत मूर्तिकारांची चिंता वाढली आहे. त्यामुळे त्यांनी संघटनेतर्फे आंदोलने केली. विधिमंडळ आणि संसदेतही हा मुद्दा चर्चेला आला.
...म्हणून मूर्तिकार होते चिंतेतमूर्तिकार संघटनांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला. राजस्थान, गुजरात, तामिळनाडू या राज्यात पीओपी वापरावर निर्बंध नाहीत. परदेशातही पीओपीच्या गणेशमूर्ती पाठविल्या जातात. राज्यात बंदी का, असा प्रश्न मूर्तिकार उपस्थित करत आहेत. या परिस्थितीत गणेश मूर्तीच्या मागणीबाबत मूर्तिकार चिंतेत असतानाच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नोंदणी सुरू झाली. सोमवारपर्यंत साडेआठशे मूर्तिकारांकडे सुमारे पाच लाख गणेशमूर्तींची नोंदणी झाली, असे मूर्तिकारांनी सांगितले.
मूर्ती सुखरूप घरी आल्याचे भाविकांना मोठे समाधान मिळते. त्यामुळे त्यांची पहिली पसंती पीओपी गणेशमूर्ती असते. गुढीपाडव्यापासून अनेकांनी पीओपी मूर्तींचीही मोठी मागणी नोंदविली आहे. -कुणाल पाटील, गणेशमूर्तीकार, हमरापूर.
पेण शहर आणि ग्रामीण भागात गणेशमूर्ती निर्मितीला वेग आला आहे. गुढीपाडव्यापासून नोंदणी सुरू झाली आहे. येत्या काही दिवसांत १० लाखांपर्यंत नोंदणी होणार आहे. -अभय म्हात्रे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य गणेशमूर्तीकार प्रतिष्ठान संघटना