पेण : कलासाधनेच्या कलादालनात अप्रतिम कलाविष्काराने नटलेल्या बाप्पाच्या २५ मूर्तींचा ताफा येत्या चार ते पाच दिवसांत मॉरिशस देशात रवाना होणार असल्याचे पेण शहरातील कलाकेंद्राचे गणेशमूर्तीकार सचिन समेळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. २०१९ या वर्षातील बाप्पाच्या परदेशवारीची पहिली आॅर्डर असून, अजून भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवास बराच कालावधी शेष असताना आपला गणपती बाप्पा सुखरूप घरी यावा, या गणेशभक्तांच्या मागणीनुसार मॉरिशस देशातील अनिवासी भारतीयांनी केली असल्याचे समेळ यांनी सांगितले. या वर्षातील पहिली आॅर्डर व बाप्पांची परदेशवारी फेब्रुवारी महिन्यातच पूर्ण होत असल्याचा आनंद व समाधान लाभल्याचे मूर्तिकार दीपक समेळ यांनी सांगितले.पेणची गणेशमूर्ती जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात परदेशी अनिवासी भारतीय नागरिक पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमधूनच बाप्पांच्या मूर्तीची मागणी करतात. परदेशातील गणेशमूर्तीची बहुतांश आॅर्डर एका कलाकेंद्रामार्फतहोत असते.गतवर्षीच्या गणेशोत्सवात याच कलाकेंद्रातून तब्बल ६५०० ते ७००० बाप्पांच्या मूर्ती विविध देशात जून, जुलै या महिन्यांत रवाना झाल्या होत्या. एप्रिल अखेरीस ते मे महिन्याच्या प्रारंभापासून बाप्पाची परदेशवारी पेणमधून सुरू होत असते. गतवर्षी हा आकडा दहा हजारांच्या वर गेला होता. अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अफ्रिका, अरब अमिराम, फिजी, मॉरिशस, सिंगापूर, थायलंड देशांमध्ये गणेशमूर्ती जात असतात. यावर्षी एप्रिलमध्ये गणेशमूर्तीचा सुरू होणारा प्रवास फेब्रुवारीमध्ये प्रारंभ झाला आहे. बाप्पाच्या मूर्ती येत्या बुधवारपर्यंत पॅकिंग करून मॉरिशियसला रवाना होणार आहेत.मीडियाचा वापरसध्या मार्केटिंगमध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, सोशल मीडियाच्या साइटवर मूर्तिकार नव्याने बनविलेल्या मॉडेल्स ती मूर्तिकला सादर करीत असल्याने त्याची प्रसिद्धी मोठ्या प्रमाणावर होत आहे. एकापेक्षा एक सरस अशा कलाकृती तथा मूर्तीचे देखणे रूप पाहून गणेशभक्त मोहित होतात आणि त्या अनुषंगाने मागणी करतात.
गणेशमूर्ती मॉरिशसला रवाना!, पेणमधील कलाकेंद्रातून २५ गणेशमूर्तींची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2019 11:56 PM