बाप्पा पावला! पेणमध्ये यंदा कोट्यवधींची उलाढाल; लाखो गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2022 07:28 AM2022-08-22T07:28:52+5:302022-08-22T07:29:11+5:30
पेण तालुक्यातून १४ ते १५ लाख गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. या व्यवसायातून १३ कोटींची उलाढाल होत आहे.
गडब :
पेण तालुक्यातून १४ ते १५ लाख गणेशमूर्ती देश-विदेशात रवाना झाल्या आहेत. या व्यवसायातून १३ कोटींची उलाढाल होत आहे. तालुक्यातून अमेरिका, सिंगापूर, थायलंड आदी देशांसह गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश आदी राज्यात गणेशमूर्ती रवाना झाल्या आहेत.
पेण तालुक्यात सुमारे १२००च्या आसपास असलेल्या छोट्या-मोठ्या कारखान्यांतून सुमारे १२ ते १५ लाखांच्या आसपास मातीच्या गणेशमूर्ती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती होते. त्यामुळे सुमारे पाच ते सहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. पेण शहरात गणेश चित्रकला मंदिरात
धोंडपाडा उंबर्डे आदी अनेक गावांतील कामगार गणेशमूर्ती घडविण्यासाठी येतात.
पेण तालुक्यातील पेण शहरासह हमरापूर, तांबडशेत, जोहे, कळवे, दादर, उबर्डे, गडब, कांदळेपाडा, शिर्की, वडखळ आदी ठिकाणी तालुक्यात गणपतीचे कारखाने आहेत. हे कारखानदार कामगारांकडून रोजंदारीने कामे करून घेत आहेत. त्यांना ४०० ते ५०० रुपये तर जुन्या कामगारांना ६०० ते ७०० रुपये रोज दिला जातो. आखणी कामासाठीचा दर एका छोट्या नगासाठी २० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत असतो. अखेरच्या जुलै, ऑगस्ट महिन्यात रात्रपाळीसाठी प्रत्येक तासाला ४० ते ५० रुपये इतका दर दिला जात आहे.
या हस्त व्यवसायात निव्वळ ५ ते ६ हजार कामगारांना रोजगार मिळतो आहे. वस्रालंकार, हिरेजडीत व फेटेवाले गणेशमूर्तींना मोठी मागणी आहे. यामध्ये दीड ते दोन फुटाची वस्त्रालंकार केलेली गणेशमूर्ती तीन ते चार हजार रुपये, तर हिरेजडीत चार ते पाच हजार रुपयांना मिळते.
गणेशमूर्तीसाठी पर्यावरणपूरक रंग
पेण तालुक्यातील जेएसडब्ल्यू कंपनीने सर्व गणेश मूर्तिकारांसाठी पर्यावरणपूरक, पाण्यात विरघळणारे व शरीराला हानीकारक नसणारे रंग पुरविले आहेत.
यासाठी तीन दिवसांचा रंगमहोत्सव पेण शहरात भरवून प्रत्येक कारखानदाराला किमान ११ ते १२ हजार रुपये किमतीचे पर्यावरणपूरक रंग दिल्यामुळे कारखानदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे.
या तीन दिवसांत एक हजार मूर्तिकारांनी उपस्थिती दर्शवून यावर्षी किमान पाच लाखांहून अधिक गणेशमूर्ती पर्यावरणपूरक रंगाने रंगविणार आहेत.
१२०० च्या आसपास असलेल्या छोट्या-मोठ्या कारखान्यांतून सुमारे १२ ते १५ लाखांच्या आसपास मातीच्या गणेशमूर्ती व प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींची निर्मिती होते. त्यामुळे सुमारे पाच ते सहा हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, शाडूची माती, रंग, विजेचे दर, मजुरीचे वाढलेले दर, वाहतुकीचा वाढलेला खर्च यामुळे मूर्तीच्या दरात वाढ करावी लागली असली तरी सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात मूर्ती देण्याचा प्रयत्न आहे. तर ज्वेलरी व वस्त्रालंकार व ज्वेलरीच्या मूर्तीना मोठी मागणी आहे.
- नितीन पाटील,
श्रीयोग आर्ट्स, गडब