कर्जतमध्ये कृत्रिम तलावांकडे गणेशभक्तांनी फिरवली पाठ; बहुतेकांनी उल्हास नदीत केले विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:10 AM2020-08-28T00:10:01+5:302020-08-28T00:10:22+5:30

तालुक्यात ५९८३ गणपती, २६१० गौरी

Ganesha devotees turn their backs on artificial lakes in Karjat; Most were immersed in the Ulhas River | कर्जतमध्ये कृत्रिम तलावांकडे गणेशभक्तांनी फिरवली पाठ; बहुतेकांनी उल्हास नदीत केले विसर्जन

कर्जतमध्ये कृत्रिम तलावांकडे गणेशभक्तांनी फिरवली पाठ; बहुतेकांनी उल्हास नदीत केले विसर्जन

Next

कर्जत : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने गणरायाच्या विसर्जनासाठी या शहरात ठीकठिकाणी १० कृत्रिम तलाव तयार केले होते. दीड दिवसाच्या गणरायाचे विसर्जन बऱ्याच भाविकांनी त्या तलावांमध्ये केले होते. मात्र त्यानंतर ठेकेदाराने त्या गणेशमूर्तींची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली नाही. स्मशानाजवळ खड्डा खोदून त्यामध्ये मूर्ती टाकल्या. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखवल्या. त्यामुळे गुरुवारी बहुतांश भाविकांनी कृत्रिम तलावांकडे पाठ करून पारंपरिक पद्धतीने उल्हास नदीच्या गणेश घाटांवर जाऊन ५९८३ गणरायांचे व २६१० गौरींचे विसर्जन केले.

कर्जत तालुक्यात दरवर्षी पुढच्या वर्षी लवकर या, अशा उत्साहात गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात येते. यंदा कोरोनाचे संकट असल्याने कर्जत नगर परिषदेने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून गणेश विसर्जनासाठी कर्जत नगर परिषद क्षेत्रातील कर्जत, मुद्रे, आकुर्ले, भिसेगाव, गुंडगे व दहिवली येथे एकूण दहा कृत्रिम तलाव तयार करून घेतले. त्यासाठी त्यांनी ठेकेदाराची नियुक्ती केली. नगर परिषदेच्या वतीने कृत्रिम तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे चारशे दीड दिवसाच्या गणरायांचे या तलावांमध्ये विसर्जन केले. मात्र त्यानंतर ठेकेदाराने त्या जमा झालेल्या गणेशमूर्ती सुरुवातीला कचरा डेपो येथे खड्ड्यात टाकण्यास नेल्या; मात्र तेथे एका भविकाने विरोध केल्याने त्या मूर्ती मुद्रे खुर्द गावा जवळील स्मशानभूमीच्या नजीक खड्डा खोदून त्यामध्ये अस्ताव्यस्तपणे टाकल्या. याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या व काहींनी या प्रकाराचा जाहीर निषेध केला.

या प्रकाराने भावनावश झालेल्या कर्जतकर भाविकांनी गौरी-गणपतींचे विसर्जन कृत्रिम तलावांत न करता पारंपरिक पद्धतीने पूर्वीसारखेच उल्हास नदीच्या घाटावर जाऊन केले. या वेळी भाविकांमध्ये उत्साह नव्हता. मुद्रे परिसरातील भाविकांनी त्या भागात वाहणाºया उल्हास नदीत, भिसेगाव व गुंडगे भागातील भाविकांनी कर्जत शहरातील गणेश घाटावर, दहिवली येथील भाविकांनी दहिवली येथील गणेश घाटावर आणि आकुर्ले येथील भाविकांनी आकुर्ले येथील गणेश घाटावर जाऊन गौरी-गणपतींचे विसर्जन केले.

तालुक्यात कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ सार्वजनिक, ३८३० खाजगी व १३४६ गौरी, नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०८३ खाजगी व १२५२ गौरींचे तर माथेरान पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ सार्वजनिक, ६४ खाजगी व १२ गौरींचे असे एकूण ५९८३ गणरायांचे व २६१० गौरींचे विसर्जन करण्यात आले. या वेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. विसर्जन शांततेत पार पडले.

1) दीड दिवसाच्या गणेश विसर्जनानंतर झालेल्या प्रकारावर सर्वप्रथम मनसेचे शहर अध्यक्ष समीर चव्हाण यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन जाहीर निषेध व्यक्त केला, त्यानंतर राष्ट्रवादी काँगेसचे माजी आमदार व जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत ‘मी माझ्या गौरी व गणपतीचे विसर्जन पारंपरिक पद्धतीने उल्हास नदीच्या घाटावर जाऊन करीन,’ असे स्पष्ट करून या घटनेने भावना दुखल्याचे सांगितले.
2)त्यापाठोपाठ काँग्रेस तालुका अध्यक्ष मुकेश सुर्वे यांनी मीसुद्धा माझ्या गणरायाचे विसर्जन माझे वडील माजी आमदार तुकाराम सुर्वे करीत होते त्याच पारंपरिक पद्धतीने उल्हास नदीच्या घाटावर जाऊन करीन, असे स्पष्टपणे सांगून नदीचे प्रदूषण थांबवायचे असेल तर प्रथम महावीर पेठेतील इमारतीमध्ये राहणाऱ्यांचे मलमूत्र उल्हास नदीमध्ये येते त्याचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा, असेही सूचित केले. याबाबत नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी गणेश विसर्जनाबाबत ‘राजकारण’ करू नये, असे सांगितले.

Web Title: Ganesha devotees turn their backs on artificial lakes in Karjat; Most were immersed in the Ulhas River

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.