अलिबाग : अनंत चतुर्थी दिवशी गुरुवारी दहा दिवसाच्या गणरायाचे विसर्जन समुद्र, नदी, तलाव, खाडी मध्ये करण्यात आले. अलिबाग वरसोली समुद्रातही गणेशभक्तांनी गणरायाची मूर्ती वाजत गाजत विसर्जित केली. मात्र ओहटी शुक्रवारी गणरायाच्या मूर्ती ह्या पुन्हा किनारी वाहत आल्या होत्या. वरसोली समुद्रकिनारी व्यायाम साठी गेलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक यांनी वाहत आलेल्या गणेशमूर्ती खोल पाण्यात नेऊन पुन्हा विसर्जित केल्या.
गुरुवारी २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीचे दहा दिवसाच्या गणरायाचे विसर्जन वरसोली येथील गणेशभक्तांनी समुद्रात केले. सायंकाळी ओहटी असल्याने आत जाऊन गणरायाच्या मूर्ती पाण्यात भाविकांनी विसर्जित केल्या. मात्र भरती आल्यानंतर विसर्जित झालेल्या काही मूर्ती ह्या पुन्हा वरसोली समुद्र किनारी वाहत आल्या. त्यामुळे समुद्रकिनारी गणरायाच्या वाहत आलेल्या मूर्ती अस्तावस्त पडल्या होत्या. त्या मुर्त्या पुन्हा समुद्रात विसर्जन करणे आवश्यक होते.
रायगड पोलीस दलातील कवायत निर्देशक रापोनि विजय बाविस्कर आणि नव नियुक्त पोलीस शिपाई हे नेहमीप्रमाणे सकाळी वरसोली समुद्रकिनारी व्यायमकरिता गेले होते. समुद्रकिनारी गेल्यानंतर त्यांना समुद्रात विसर्जित केलेल्या गणेशमूर्ती किनारी वाहत आलेल्या दिसल्या. बाविस्कर यांनी आपले सहकारी आणि स्थानिकांच्या मदतीने वाहत आलेल्या गणेश मूर्ती गोळा करून खोल समुद्रात जाऊन पुन्हा विसर्जित केल्या. त्यामुळे वाहत आलेल्या गणेश मूर्तीचे पुन्हा पोलिसांच्या मदतीने विसर्जन करण्यात आले.