अलिबाग - समाजामध्ये एकोपा आणि सलोख्याचे संबंध वृद्धिंगत व्हावे, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना आता जिल्ह्यामध्ये जोर धरताना दिसून येते. यावर्षी जिल्ह्यातील 22 गावांमध्ये, ‘एक गाव एक गणपती’ उत्सव धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. एखादी नवीन स्टाईल अथवा नवा ट्रेंड हा शहराकडून ग्रामीण भागाकडे जातो. ग्रामीण भागातील नागरिक विशेष करून तरुणाई तो ट्रेंड तातडीने आत्मसात करतात परंतु अशा काही तुरळकच प्रथा, गोष्टी आहेत.
ग्रामीण भागाकडून शहराकडे जातात. समाजामध्ये एकोपा निर्माण करणारी आणि आर्थिक उधळपट्टीला चाप लावणारी ‘एक गाव एक गणपती’ ही ग्रामीण भागातील प्रथा शहरवासीय कधी आत्मसात करणार हाही प्रश्नच आहे. शहरी आणि ग्रामीण विभागातील भक्तांना दहा दिवस निखळ आनंद देणारा उत्सव म्हणून गणेशोत्सवाकडे पाहिले जायचे. मात्र, बदलत्या काळात गणेशोत्सवाचा ‘इव्हेंट’ झाल्यापासून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण आले आहे. विविध मंडळे ही स्थानिक राजकीय नेत्यांच्या दावणीला बांधलेली असल्याने त्यामध्ये भक्तीचे प्रमाण कमी झाल्याचे बोलले जाते.
गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलावर मोठा ताण असतो. त्यातच सार्वजनिक गणपतींची वाढती संख्या ही पोलिसांच्या कामात भर पाडणारीच आहे. काही मंडळे आपलाच गणपती कसा मोठा आहे? आमच्याच मंडळांची मिरवणूक किती मोठी आहे. हे दाखविण्यासाठी मंडळांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
मुंबईसह पुण्यासारख्या शहरातच नव्हे, तर गावागावांतील गणेशोत्सव शांततेत पार पाडणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरू लागले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत सार्वजनिक गणेशोत्सवात होणारी पैशांची उधळपट्टी थांबावी, गावातील वाद मिटावेत आणि लोक वर्गणीचा चांगल्या कामासाठी उपयोग व्हावा, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन मतीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी ‘एक गाव एक गणपती’चा पुरस्कार करीत, हा उपक्र म गावागावांत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी ‘महात्मा गांधी तंटामुक्त गाव’ अभियानात, ‘एक गाव एक गणपती’च्या उपक्रमाचा समावेश करून या चळवळीला राजकीय बळ देण्याचे काम केले.
भाद्रपद महिना म्हणजे गणेशोत्सवाचा जल्लोष. या दिवसांत बाजारपेठांतील गल्ली अन गल्ली मंगलमय रूप धारण करते. गणेशोत्सव उत्साहात पार पडल्यानंतर प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्या एकजूटीतून जिल्ह्यातील 22 गावांत एक गाव-एक गणपती हा उपक्रम साकारण्यात आला. गणेशोत्सवात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस दलावर मोठा ताण असतो. त्यामुळे नागरीकांनी जबाबदारीने वागून पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन यांनी केले आहे.
- अशोक दुधे, जिल्हा पोलीस अधिक्षक.