पेण : कोरोना संकट असतानाही विन्घहर्ता श्री गणेशाची परदेशवारी अर्थात सातासमुद्रापारचा प्रवास सुरू झाला आहे. पेणच्या दीपक कला केंद्रातून शाडू मातीच्या व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ५००० गणेशमूर्ती अमेरिका, थायलंड या देशांमध्ये आज (दि. २३ मे) रवाना होणार असल्याचे मूर्तीकार दीपक समेळ यांनी सांगितले.बाप्पांच्या परदेशवारीस अखेर सरकारची मान्यता मिळाल्याने व परदेशातील अनिवासी भारतीयांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या ऑर्डरनुसार पेणमधील कार्यशाळांनी मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार गणेश मूर्ती पाठविण्यात आल्याचे कार्यशाळा सूत्रांंनी माहिती देताना सांगितले. २०२१ या वर्षातील गणेशोत्सव १० सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असल्याने मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच ही ऑर्डर उशिरा का होईना परंतु जात असल्याने मूर्तीकारांनी समाधान व्यक्त केले आहे.गतवर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत बाप्पांच्या परदेशवारीत खंड पडून २५ हजार गणेश मूर्तींची परदेश वारी न झाल्याने मूर्तीकारांना मोठा आर्थिक फटका बसला होता. यावर्षीही पुन्हा एकदा कोरोना महामारीची दुसरी लाट सुरू झाल्याने मार्च महिन्याच्या अखेर मागणी केलेल्या गणेशमूर्तींची ऑर्डर अखेर मे महिन्याच्या अखेरीस जाण्यासाठी परवानगी मिळाल्याने पेणच्या मूर्तीकला विश्वात आनंद व्यक्त केला जात आहे. साधारणपणे पाऊणफूट उंचीपासून पाच फूट उंचीच्या मूर्ती थायलंड, अमेरिका, लंडन, माॅरिशस या देशांत सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी समुद्रमार्गे पोहोचतील. ४० फूट लांब कंटेनर ४० फूट लांब कंटेनरमध्ये १००० लहान मूर्ती सामावतात. तर दोन व पाच फूट उंचीच्या ५०० ते ६०० बाॅक्स कंटेनरमध्ये असून, अशा सात कंटेनरममधून मूर्ती जाणार आहेत. गणेशोत्सव १० सप्टेंबर रोजी प्रारंभ होत असल्याने मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच ही ऑर्डर मिळाल्याने मूर्तीकारांनी समाधान व्यक्त केले आहे.
पेणचे बाप्पा निघाले ‘परदेशवारी’ला! ५००० गणेशमूर्ती आज होणार रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 8:27 AM