आगरदांडा : मुरुड शहरात ठिकठिकाणी घरगुती गणेशमूर्तींचे आगमन काही दिवसांवर येऊन ठेपले असले, तरी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे पालिकेचे आश्वासन हवेत विरले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. रोडरोलरचा वापर न करता खड्डे न बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न नगरपरिषदेकडून करण्यात आला; परंतु पावसाच्या तडाख्यामुळे या रस्त्यात पुन्हा खड्डेच पडू आले आहेत.काही दिवसांपूर्वी जुनीपेठ ते मधली आळीपर्यंत खड्डे बुजविण्यात आले खरे, परंतु या दोन दिवसांत पावसाच्या पाण्याने पुन्हा त्याच रस्त्यावर खड्डे दिसू लागले आहेत. शहरातील काही भागांत अजूनपर्यंत खड्डे बुजविण्यास सुरुवातही केली नाही. अंजुमन हायस्कूल मुख्य रस्त्याची अवस्था दयनीय झाल्याने एका बाजूचा संपूर्ण रस्ता सतत पाण्याखाली गेल्याने मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. या भागात बाप्पांचे आगमन खड्डेमय रस्त्यातून होईल, असे दिसत आहे. त्यामुळे युद्धपातळीवर पुन्हा पालिकेने खड्डे बुजविण्याची मोहीम राबवायला हवी, अशी मागणी मुरुड शहरातील असंख्य नागरिक करीत आहेत, तसेच प्रत्येक पाखाड्यातून खड्डे बुजविण्याची मोहीमही जोरदार हाती घ्यायला हवी, असे भाविकांचे म्हणणे आहे.पावसाळा संपत आला, तरी पालिकेकडून खड्डे बुजविण्याची कार्यवाही प्रभावीपणे झालेली दिसून येत नाही, अपुरे मनुष्यबळ व रोडरोलरचा वापर न केल्याने जुनीपेठ या रस्त्यावरील अवस्था जैसे थे आहे.>शहरातील रस्ते सुस्थितीत करावेतपुन्हा चांगल्या दर्जाचे डांबर व खडी मिक्स करून त्यावर रोलर फिरून गणेशोत्सवापूर्वी मुरुड शहरातील खड्डे बुजवून रस्ते सुस्थितीत करावे, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. मात्र, काही ठिकाणी अद्याप खड्डे तसेच आहेत.तरी पालिकेने त्वरित खड्डे बुजविण्याची मोहीम जोरदार हाती घ्यायला हवी, अशी गणेशभक्तांची मागणी आहे. यामुळे बाप्पाचाप्रवास खड्डेमुक्त रस्त्यातून होईल आणि नागरिकांची गैरसोयदूर होईल.
गणेशोत्सव आला तरी खड्डे जैसे थे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 1:53 AM