विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा मध्य प्रदेशातील जबलपूरपर्यंत पाठलाग करून चौघांना अटक करण्यात रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकास यश आले आहे. याबाबतची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी दिली.रायगड जिल्ह्यातील कर्जत, खोपोली, पाली, माणगाव आणि पोलादपूर येथे घडलेल्या एकूण सहा गुन्ह्यांतील ३ लाख ६२ हजार रुपये किमतीचे सर्व सोन्याचे दागिने परत मिळविण्यात यश आले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये टोळीचा प्रमुख वसीम अब्बास (रा. आंबिवली-ठाणे), जयकुमार रजाक (रा. जबलपूर), धृवकुमार त्रिपाठी (उत्तर प्रदेश) आणि इर्फान खान (मध्य प्रदेश) यांचा समावेश आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रायगड जिल्ह्यात सोन्याचे दागिने लुटल्याचे गुन्हे दाखल झाले होते. स्थानिक पोलिसांबरोबरच जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून समांतर तपास सुरू करण्यात येत होता. तांत्रिक कार्यपद्धती आणि उपलब्ध सीसीटीव्ही फूटेज यांच्या माध्यमातून गुन्ह्यांतील आरोपी निष्पन्न झाले. रायगडबरोबरच राज्यात नागपूर शहर पोलीस हद्दीत ११, पुणे ५, पालघर १, अहमदनगर १, यवतमाळ १, चंद्रपूर १, मुंबई १ असे एकूण २१ गुन्हे तर दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार व राजस्थान या राज्यांतही अशाच प्रकारे गुन्हे केले असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
दागिने लुटणारी टोळी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 1:09 AM