जिल्ह्यातील गावांमध्ये परिवर्तनाची गंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 12:47 AM2018-12-07T00:47:16+5:302018-12-07T00:47:24+5:30
राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ७५० गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमच राज्य शासन आणि कॉर्पोरेट संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येत असलेल्या ग्रामपरिवर्तन उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला
- जयंत धुळप
अलिबाग : राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ७५० गावांमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाउंडेशनच्या माध्यमातून प्रथमच राज्य शासन आणि कॉर्पोरेट संस्थांच्या एकत्रित प्रयत्नातून राबविण्यात येत असलेल्या ग्रामपरिवर्तन उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला असून कृषी, पाणीपुरवठा, स्वच्छता यासाठीच्या योजनांमध्ये लोकसहभागवाढी सोबतच ग्रामीण विकासासाठी एकत्र येऊन गावात स्थित्यंतर आणले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले आहे.
बुधवारी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे फाउंडेशनच्या नियामक परिषदेची चौथी बैठक झाली. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसायमंत्री महादेव जानकर, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा, कॉर्पोरेट क्षेत्रातील दीपक पारेख, किशोर बियाणी, रोनी स्कूवाला, जागतिक बँकेचे भारतातील प्रमुख जुनेद अहमद आदी मान्यवर उपस्थित होते.
शासन आणि खासगी संस्था एकत्र आल्यास कशाप्रकारे ग्रामीण भागाचा विकास होऊ शकतो, याचे उत्तम उदाहरण या माध्यमातून पाहायला मिळते. फाउंडेशनच्या माध्यमातून ३८५ ग्रामपरिवर्तकांनी राज्यातील २२ जिल्ह्यांतील ७५० गावांमध्ये विकासाचे काम नेण्यासाठी मोलाची मदत केली आहे. ७५० गावांच्या परिवर्तनापासून सुरू झालेला हा प्रवास १० हजार गावांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्याकरिता या वेळी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा
दिल्या.
>२२ गावांसाठी ६५ कोटींचा आराखडा मंजूर
रायगड जिल्ह्यात सन २०१८-१९ मध्ये २२ गावांसाठी ६५ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला असून, विविध विकासाची कामे प्रत्यक्ष सुरू आहेत. या योजने अंतर्गत बचतगटातील महिलांना प्रशिक्षण देऊन एलईडी बल्ब निर्मिती व्यवसाय कार्यान्वित करण्यात आला आहे. भाजीपाला उत्पादकांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात आले असून, येत्या काळात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात येणार आहेत. ग्रामीण महाराष्ट्राचा चेहरा बदलत आहे. स्वच्छता, सर्वांना घरे, पाणीपुरवठा या क्षेत्रात राज्य शासनाचे काम चांगले असून, फाउंडेशनच्या माध्यमातून होत असलेले स्थित्यंतर अभिनंदनीय असून त्यात सातत्य ठेवावे, अशी अपेक्षा ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी या वेळी व्यक्त केली.स्वयंरोजगारासाठी पेपर डिश बनविणे, अशा प्रकारच्या व्यवसायांना प्रोत्साहन व बेरोजगार युवकांना साहाय्य करण्यात येत आहे. कौशल्य वृद्धी करून रोजगार उपलब्ध करून देण्यावर अधिक भर देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.
>रायगड जिल्हा आघाडीवर
फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामाचे सादरीकरण रायगड, यवतमाळ, वर्धा, अमरावती, गडचिरोली येथील जिल्हाधिकाऱ्यांनी केले. रायगड जिल्ह्यातील २२ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील ५५ गावांत झालेल्या परिवर्तनाचे सादरीकरण रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले.
या कामात रायगड जिल्हा आघाडीवर असल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांनी या सादरीकरणाची विशेष प्रशंसा केली. रायगड जिल्ह्यातील या ५५ गावांमध्ये मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक नेमण्यात आले असून, ग्रामविकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे.
रायगड जिल्ह्यात स्वदेस फाउंडेशन ही संस्था प्रमुख विकास भागीदार म्हणून काम करीत असून, ग्रामविकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास परिवर्तन कार्यालय मुंबई, शासकीय कार्यालयातील कृतिसंगम अनुदान, जिल्हा नियोजन समिती व स्वदेस फाउंडेशनमार्फत अनुदान उपलब्ध करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.