दहशतवाद आणि हुकुमशाही यांची गंगोत्री म्हणजे शेकाप; शहाजीबापूंची टीका
By राजेश भोस्तेकर | Published: November 7, 2022 02:28 PM2022-11-07T14:28:18+5:302022-11-07T14:31:17+5:30
अलिबाग जवळील रेवदंडा येथे शिवसेना शिंदे गटाच्या एका पक्षप्रवेश कार्यक्रमास पाटील उपस्थित होते.
अलिबाग : दहशतवाद आणि हुकुमशाही याची गंगोत्री म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. देशाच्या पातळीवर एकच असा पक्ष होता, तो म्हणजे कोलकत्याचा कम्युनिस्ट पक्ष. हुकुमशाहीच्या जोरावर त्यांनी सत्ता इतरत्र जावू दिली नाही. त्यामुळे दरवेळी तीच माणसं निवडून येत राहिली, अशा शब्दात आमदार शहाजीबापू पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षावर हल्लाबोल केला.
अलिबाग जवळील रेवदंडा येथे शिवसेना शिंदे गटाच्या एका पक्षप्रवेश कार्यक्रमास पाटील उपस्थित होते. यावेळी आमदार शहाजी बापू पाटील यांनी शेकापवर टीकास्त्र सोडले. अलिबाग मध्ये शेकाप हा सत्तेत राहिला आहे. ही माणसं सातत्याने निवडून येत असल्याने बाहेरच्या लोकांना ती मोठी वाटत होती. परंतु त्यांच्या मतदार संघातील लोक दोन वेळच्या अन्नालाही मोताद होते, अशी टीका शहाजीबापू यांनी शेकपवर केली आहे.
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, जिल्हाप्रमुख राजा केणी यावेळी उपस्थित होते. आमदार शहाजी बापू पाटील यांच्या या टीकेने अलिबाग सह जिल्ह्यात शेकाप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्यात संघर्ष अजून तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.