गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला! गौरी गणपतीचं शांततेत विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 12:03 AM2020-08-28T00:03:26+5:302020-08-28T00:03:45+5:30
विशेष म्हणजे कोकणातील घरगुती गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण उत्साहात साजरा होतो. या वर्षीही आळीगलीतून घरोघरी रात्रंदिवस भजनाने भक्तीमय वातावरण दिसून आले.
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील घरगुती गौरीगणपतींचे विसर्जन उत्साहात करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने साजरा होत आहे. या वेळी बोर्लीपंचतन परिसरात सार्वजनिक १ तर ४५०५ घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. यातील ९०० गौरींचे व २५०० गणेशमूर्ती मिळून एकूण ३४०० गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. गेले पाच दिवस ज्या गणपती बाप्पाची मनोभावे पूजा केली, त्या बाप्पाला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला.
विशेष म्हणजे कोकणातील घरगुती गणेशोत्सव वैशिष्ट्यपूर्ण उत्साहात साजरा होतो. या वर्षीही आळीगलीतून घरोघरी रात्रंदिवस भजनाने भक्तीमय वातावरण दिसून आले. तर दुसरीकडे बहुंताश ठिकाणी गणेशोत्सवातून सामाजिक, प्रबोधनात्मक संदेश देण्यात आले. कोरोना पार्श्वभूमीवर आरोग्यविषयक जनजागृती करण्यात आली. या वेळी बोर्लीपंचतन येथील सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्याचा हेतू सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरतोय. त्याचप्रमाणे विर्सजन सोहळा र्निविघ्न पार पाडण्यासाठी पोलीस व जीवरक्षक तैनात होते.
गणराय विराजमान होण्याचा दिवस यानंतर पाच दिवसांमध्ये घरोघरी बाप्पासमोर भजन, आरतीने केले जाणारे जागरण, तो क्षण पाहता सर्व उत्सवावर कोरोनाचे सावट असताना या गणेशोत्सवामुळे सर्वत्र नवचैतन्य आले होते. गुरुवारी आपल्या बाप्पाचे विसर्जन होणार असल्याने भक्तगणात थोडीफार नाराजी दिसून येते. मात्र, यावर भक्तगण उत्साही अशा संमिश्र वातावरणात ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष करीत आणि पुढल्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण देत गणरायाला भावपूर्ण निरोप देत होते.
तळा तालुक्यात साधेपणाने निरोप
शनिवारी २२ आॅगस्ट रोजी विराजमान झालेल्या गणपतींना पाच दिवसांच्या सेवेनंतर गौरीसह साधेपणाने निरोप देण्यात आला. दरवर्षी आपल्या लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करणारे गणेशभक्त बाप्पाचे विसर्जनही तितक्याच उत्साहात करतात. मात्र यंदा सर्वच सणांवर कोरोनाचे सावट असल्याने या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. नागरिकांनी कोरोनाचा धसका एवढा घेतला की उत्साहाचे उसने अवसान आणल्यासारखा हा उत्सव साजरा करण्यात आला. आरती, भजनाचे सूर तर दूर राहिले घराघरांत वाजविली जाणारी गणेशगीतेही कानावर पडली नाहीत. नागरिकांनी कोणताही गाजावाजा न करता हातगाडीवर गणपतीची विसर्जन मिरवणूक काढली. विसर्जन घाटावर तळा नगरपंचायतीकडून निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले होते. आरती समाप्तीनंतर भाविकांकडून आपल्या लाडक्या गणरायाला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला.
नागोठणेत अंबा नदीच्या घाटावर शांततेत विसर्जन
गौरी - गणपतीचा विसर्जन सोहळा शहरात गुरुवारी विविध ठिकाणी मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पडला. दुपारी तीननंतरच शहराच्या विविध भागांतील गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले होते. आंगरआळीतील गणेशमूर्ती शृंगार तळे, खडकआळीतील जोगेश्वरी मंदिरासमोरील तलावात तर, प्रभुआळीतील गणेशमूर्तींचे रामेश्वर मंदिरासमोरील तलावात विसर्जन करण्यात आले. मुख्य विसर्जन सोहळा अंबा नदीच्या घाटावर पार पडला. या ठिकाणी दुपारी साडेतीनला पहिल्या गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर विसर्जनासाठी गणपतीच्या मूर्तींची रांग लागण्यास प्रारंभ झाला होता.