महाड तालुक्यात गारठा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 12:17 AM2020-01-06T00:17:40+5:302020-01-06T00:17:47+5:30

उत्तर भारतात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडी आठवडाभर आधीच दाखल झाली असली, तरी महाड तालुक्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून गारठा पडू लागला आहे.

Garatha grew up in Mahad taluka | महाड तालुक्यात गारठा वाढला

महाड तालुक्यात गारठा वाढला

googlenewsNext

दासगाव : उत्तर भारतात आणि महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात थंडी आठवडाभर आधीच दाखल झाली असली, तरी महाड तालुक्यात मात्र गेल्या दोन दिवसांपासून गारठा पडू लागला आहे. यामुळे थंडीमध्ये लागणारे उष्ण कपडे खरेदीमध्ये वाढ झाली आहे. याचा परिणाम पिकांवरही जाणवू लागला आहे.
साधारणपणे पावसाळा गेल्यानंतर लगेचच थंडी पडू लागते. यावर्षी लांबलेला पाऊस आणि अवेळी पडणारा पाऊस यामुळे थंडी किमान एक महिना पुढे सरकली. यामुळे यावर्षी महाड तालुक्यात अद्याप थंडी जाणवत नव्हती. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून गारठा पडू लागल्याने सर्वत्र हुडहुडी निर्माण झाली आहे. यामुळे महाड तालुक्यात पहाटेपासून दव पडून दाट धुकेही पडू लागले आहे. या धुक्यामुळे पहाटेच्या सुमारास घरातून बाहेर पडणेही कठीण होऊन बसले आहे. दाट धुके आणि दव यामुळे वाहनचालकांनाही त्रास होत आहे. थंडीतून वाचण्यासाठी दुचाकीचालक आणि सर्वसामान्य नागरिक उष्ण कपडे खरेदीसाठी कपड्याच्या दुकानात गर्दी करू लागले आहेत.
स्वेटर, हातमोजे, पायमोजे, याचबरोबर तोंडाचा मास्क, शाल, मफलर आदी प्रकारच्या कपड्यांची मागणी वाढली आहे. नेपाळमधून विक्रीस येणारे विक्रेते गेली काही वर्षे या विभागात फिरकले नसल्याने दुकानात मात्र अधिक दराने या कपड्यांची खरेदी ग्राहकांना करावी लागत आहे.
थंडीच्या दिवसात मात्र महाडमध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्याही कमी झाली असली तरी किल्ले रायगडावर मात्र गर्दी कायम आहे. रायगडावरील थंडी आणि धुक्यात हरवलेला निसर्ग अनुभवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून गर्दी वाढू लागली आहे. थंडीमुळे ग्रामीण भागातील पोपटी लावण्याची संख्याही वाढली आहे. उशिरा गेलेला पावसाळा आणि लांबलेली कडधान्य लागवड यामुळे यावर्षी पोपटीसाठी लागणारा पावटाही अद्याप म्हणावा तसा बाजारात दाखल झालेला नाही. थंडीचा फटकाही कडधान्य, आंबा मोहोर आणि इतर पिकांना बसण्याची शक्यात निर्माण झाली आहे. पडणाºया दवाचा फायदा कांही अंशी पिकांना होणार असला तरी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहनही कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
>नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम
दिवसा जाणवणारा उष्मा आणि रात्री पडणारी कडाक्याची थंडी यामुळे मानवी आरोग्याच्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत. हवेमध्ये आर्द्रता निर्माण होत असल्याने सर्दी, खोकला, यासारखे सामान्य वाटणारे आजारही जाणवू लागले आहेत. यामुळे दावाखान्यातही उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. श्वसनाचे विकार असलेल्यांनाही थंडी त्रासदायक ठरत आहे. याकरिता या काळात उष्ण पाणी पिण्याचा सल्लाही डॉक्टरांकडून दिला जात आहे. या दिवसात त्वचा शुष्क होत असल्याने त्वचेची काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

Web Title: Garatha grew up in Mahad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.