कर्जत मालवाडी नाल्यात कचऱ्याचे ढीग

By admin | Published: June 4, 2017 03:58 AM2017-06-04T03:58:49+5:302017-06-04T03:58:49+5:30

एकीकडे मोठ्या गजावाजात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले जात आहे. कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील

Garbage in Karjat Malwadi Nullah | कर्जत मालवाडी नाल्यात कचऱ्याचे ढीग

कर्जत मालवाडी नाल्यात कचऱ्याचे ढीग

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क

नेरळ : एकीकडे मोठ्या गजावाजात ‘स्वच्छ भारत अभियान’ राबविले जात आहे. कर्जत तालुक्यातील किरवली ग्रामपंचायत मात्र याला अपवाद ठरली आहे. या ग्रामपंचायत हद्दीतील मालवाडीमधून वाहणाऱ्या मुख्य नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य असूनही संबंधित ग्रामपंचायत प्रशासकीय यंत्रणा मात्र याबाबत उदासीन असल्याने पावसाळा तोंडावर येऊनही परिस्थिती जैसे थे आहे.
कर्जत नगरपरिषद हद्दीला लागून असलेल्या किरवली ग्रामपंचायतीतील मालवाडी गावातून वाहणाऱ्या मोठ्या नाल्यात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अन्यत्र नालेसफाईची कामे सुरू असताना मालवाडी नाला दुर्लक्षित आहे. किरवली ग्रामपंचायत हद्दीतील मालवाडीत नव्याने वसाहती उभारण्यात आल्या आहेत; परंतु या वसाहतींना ग्रामपंचायतीतर्फे मूलभूत सुविधा पुरविल्या नाहीत. ग्रामपंचायत कचरा गोळा करणारी घंटा गाडी तथा अन्य कोणतीही सुविधा नसल्याने या वसाहतीमधील नागरिक नाल्यामध्ये सर्व कचरा आणून टाकत आहेत. महिनोन्महिने हा कचरा उचलण्यात न आल्याने नाल्यात कचरा साचले. जरी हा नाला कर्जत नगरपरिषद हद्दीला लागून असला, तरी त्याची नोंद किरवली ग्रामपंचायत मालवाडीमध्ये होत असल्याने नगरपरिषद बघ्याची भूमिका घेत आहेत.
पावसाळा तोंडावर आल्याने या नाल्याची सफाई यापूर्वीच होणे अपेक्षित होती; परंतु अद्याप परिस्थिती जैसे थे आहे. पावसाळ्यापूर्वी कचरा न उचलल्यास पावसाळ्यात पाण्याबरोबर हा कचरा दूरवर पसरेल. या कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा समावेश आहे. त्यामुळे जनावरांनीही जर कचरा खाल्ला तर त्यांचे आरोग्यही धोक्यात येऊ शकते. या कचऱ्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन रोगराईलाही निमंत्रण मिळू शकते. तरी पावसाळ्यापूर्वी या नाल्यातील कचरा उचलावा, अशी मागणी जोर धरत आहे.

सुविधांअभावी कचऱ्याचे ढीग
ग्रामपंचायत हद्दीत नव्याने वसाहती उभारण्यात आल्या आहेत; परंतु या वसाहतींना ग्रामपंचायत मार्फत योग्य सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. ग्रामपंचायतीकडे कचरा गोळा करण्यासाठी घंटा गाडी व अन्य कोणतीही सुविधा नसल्याने या वसाहतीमधील नागरिक जवळच असलेल्या नाल्यामध्ये सर्व कचरा टाकत असल्याचे चित्र आहे.
किरवली ग्रामपंचायतीतर्फे लवकरच डम्पिंग ग्राउंडची निर्मिती करण्यात येईल. या नाल्याच्या पलीकडील हद्द कर्जत नगरपालिकेची असून, त्या हद्दीतील इमारतीमधील रहिवासी तेथे मोठ्या प्रमाणात कचरा आणून टाकतात.
- ज्योती बडेकर, उपसरपंच, किरवली

Web Title: Garbage in Karjat Malwadi Nullah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.