चक्रीवादळाच्या प्रकोपात बागायतदार आडवे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2020 01:54 AM2020-06-09T01:54:31+5:302020-06-09T01:54:42+5:30

६६ हजार हेक्टर क्षेत्राला बसला फटका; विशेष आर्थिक पॅकेजची मागणी

Gardeners lie in the middle of a hurricane outbreak | चक्रीवादळाच्या प्रकोपात बागायतदार आडवे

चक्रीवादळाच्या प्रकोपात बागायतदार आडवे

Next

आविष्कार देसाई

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळामुळेरायगड जिल्ह्यातील सुमारे ६६ हजार हेक्टर क्षेत्रावरील नारळ सुपारीसह आंबा, काजूच्या फळबागा पुरत्या झोपल्या आहेत. बागायतदार शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे न भरुन येणारे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारने बागायतदार शेतकऱ्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर करावे अशी मागणी होत आहे.

भारतीय अर्थ व्यवस्थेची चक्रे अधिक गतीमान होण्यासाठी उद्योगांबरोबरच कृषी क्षेत्राला आजही अनन्य साधारण महत्त्व आहे. मात्र ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे अर्थ व्यवस्थेचे दुसरे चाक कोलमडून पडले आहे. निसर्गाचा प्रकोप इतका भयानक होता की, रायगड जिल्ह्यातील नारळ, सुपारी, आंबा, काजूंच्या बागा या अशरक्ष: भूईसपाट झाल्या आहेत. अलिबाग, मुरुड, पेण, कर्जत, रोहे, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर या तालुक्यात सर्वाधिक फटका बसला आहे. वर्षानुवर्षे संगोपन केलेली झाडे नजरेच्या समोर भूईसपाट होताना पाहण्यावाचून बागायतदार शेतकºयांसमोर कोणताच पर्याय नव्हता. वादळाने तडाखा दिल्याने सर्व तयार झालेले आंबे खाली कोसळले. तशीच स्थिती नारळ, सुपारी, काजूंच्या बागांची झाली आहे.

रायगड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नारळ-सुपारी विविध राज्यांमध्ये पाठवण्यात येतात. पण वादळामध्ये बागांचे मोठे नुकसान झाल्याने नारळ, सुपारी बागायतदारांना प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे, अशी माहिती मुरुड तालुक्यातील शेतकरी विनोद पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली. सरकार आम्हाला मदत करेलही मात्र ती तुटपूंजी असणार आहे. कारण एक झाड किमान २० वर्षे फळ देते. त्यामुळे एकदाच मदत मिळून उपयोग होणार नाही. यासाठी सरकारने सरासरी काढून विशेष आर्थिक नुकसान भरपाई दिल्यास वादळात फटका बसलेल्या शेतकºयांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

निसर्ग चक्रीवादळामुळे येथील शेती, नारळ, सुपारी, काजू, आंबा या बागायती उध्वस्त झाल्या आहेत. प्रशासनाने तातडीने पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतरच नुकसानीचा अंदाज येऊ शकेल.
- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधिक्षक, अधिकारी, रायगड

निसर्ग चक्रीवादळाने संबंध कोकणातील शेती आणि बागायची भूईसापट केल्या आहेत. मोठ्या संख्येने घर, विजेच खांब, विज जनित्र यांचेही नुकसान झाले आहे. रायगडातील नागरिकांना पुन्हा उभे करण्यासाठी कोकणाला पाच हजार कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - खासदार सुनील तटकरे, रायगड

आंबा बागायतदारांचे कोट्यवधींचे नुकसान

झाडाला लागलेले आंबे खाली उतरवणे बाकी असतानाच वादळाने आमच्या बागा उध्वस्त केल्या आहेत. त्यामुळे आंबा बागायतदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेती कर्जाचे हफ्ते कसे फेडायचे, मजुरी, मशागत अशा सर्व गोष्टीच वाया गेल्या आहेत, असे अलिबाग-शेखाचे गाव येथील आंबा बागायतदार परेश म्हात्रे यांनी सांगितेल.
बागेतील आंब्याची झाडे जमिनदोस्त झाली आहेत. त्यामुळे कायम स्वरुपी उत्पादन देणारे झाड दगावले आहे. सरकारने विशेष आर्थिक नुकसान भरपाई देताना याचाही विचार करणे अधिक गरजेचे आहे. असे केले तरच बागायतदार तग धरु शकतील अन्यथा बागांप्रमाणे तेही कमरेतून मोडून पडतील याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

रायगडमधील बागायतीचे क्षेत्र : रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे २१ हजार हेक्टरवर नारळाचे उत्पादन घेतले जाते. तसेच नऊ हजार हेक्टर क्षेत्रामध्ये सुपारीचे पीक घेतले जाते. सुमारे २६ हजार हेक्टरवर आंब्याची लागवड होते, तर तब्बल १० हजार हेक्टर क्षेत्रावर काजूची शेती केली जाते.

Web Title: Gardeners lie in the middle of a hurricane outbreak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.