- दीपक साळुंखे
बिरवाडी : महाड एमआयडीसी मधील प्लॉट नंबर ई 6 वरील इंडो अमाईन्स लिमिटेड कारखान्यांमध्ये एच टू एस (हायड्रोजन सल्फाइड) या मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या वायूची गळती झाल्याने कारखान्यातील सात कामगार बाधित झाल्याची घटना गुरुवार 21 जानेवारी 2021 रोजी सायंकाळी 6:15 वा घडली आहे.
याबाबत महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पंकज गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार वरील कारखान्यातील एच टु एस या वायूच्या गळतीमुळे या ठिकाणी काम करणारे सात कामगार बाधित झाले असून नायर या कामगारांची प्रकृती चिंताजनक होती मात्र या कामगारांना महाड शहरातील देशमुख हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचाराकरिता ठेवण्यात आले असून उपचारानंतर कामगारांची प्रकृती स्थिर आहे. वायू गळती थांबविण्यात यश आले असून वायुगळती नेमकी कशामुळे झाली याचा खुलासा कंपनी व्यवस्थापनामार्फत करण्यात आलेला नाही. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्याकरिता कंपनीचे व्यवस्थापक जयप्रकाश शेट्टी यांच्याजवळ भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला असता ते उपलब्ध न झाल्याने या प्रकाराबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.
या कारखान्यात यापूर्वीदेखील अनेक अपघात होऊन कामगार जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत वारंवार घडणार्या अपघातांमुळे कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कारखानदारांना राजकीय पाठबळ असल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळ कारखाना निरीक्षक यांच्याकडून कारवाई करण्यास कुचराई होत असल्याची चर्चा या दुर्घटनेनंतर कामगार वर्गामध्ये सुरू झाली आहे .
दैव बलवत्तर म्हणून वाचले प्राण ...घटनेचे गांभीर्य ओळखून महाडचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश तांबे यांनी उपचार सुरू असलेल्या कामगारांच्या प्रकृतीची विचारपूस करीत रुग्णालयात तसेच घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला . महाड एमआयडीसी मधील इंडो अमाईन्स कंपनीतील वायुगळतीमुळे बाधित झालेले कामगार उत्तम किसन पवार (वय 49), तेजस विजय चाळके (वय 25) रा. आदे, जयराम चंद्रकांत चौधरी (वय 25) रा. वडघर, पंकज कुमार, सोहम महातो (वय 25) रा. छपरा बिहार, पप्पू कमल महातो (वय 25) रा. छपरा बिहार, रजनीकांत नायर (वय 34) रा. कवेआळि, दत्तात्रय रावसाहेब कोल्हे (वय 39) रा. इंडो अमाइन्स कॉलनी यांचा समावेश आहे.