कर्जत : तालुक्यातील निकोप, कडाव, मार्केवाडी, वडवली, भातगाव, वावळोली, बेंडसे, कोषाणे, सावरगाव आदी गावांच्या शेतजमिनीमधून रिलायन्स गॅस पाइपलाइन जात आहे. तशा प्रकारच्या नोटिसा भूसंपादन विभागाकडून संबंधित शेतकऱ्यांना यापूर्वीच आल्या आहेत. याबाबत अनेक वेळा शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे तरी सुध्दा भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांनी कर्जत तहसील कार्यालयात शेतकऱ्यांना सुनावणीला बोलावले होते, आमचा विरोध असून सुध्दा आम्हाला नोटीस पाठवून सुनावणीला बोलावले. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी या अधिकाऱ्यांचे दप्तर उचलून पोलीस ठाण्यात नेले व सुनावणी बंद पाडली. भारत सरकारने सार्वजनिक हिताच्या दृष्टीने इथेन वाहतूक करण्यासाठी दहेज ते नागोठणेपर्यंत रिलायन्स गॅस पाइपलाइन्स लिमिटेड कंपनीला पाइपलाइन टाकण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार कर्जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना जमिनीखालून पाइपलाइन टाकण्यासाठी जमिनीच्या वापराबाबतचे हक्क संपादन करण्याच्या नोटिसा सूर्या प्रकल्प डहाणू तथा सक्षम प्राधिकारी रिलायन्स गॅस पाइपलाइन्स लिमिटेडचे भूसंपादन उपजिल्हाधिकारी अभय करगुटकर यांच्या स्वाक्षरीने १ आॅगस्ट २०१५ ला बजावण्यात आल्या होत्या. या नोटिसीला शेतकऱ्यांनी लेखी स्वरूपात हरकती घेतल्या आहेत. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे, तरी सुध्दा हालीवली, देऊळवाडी, वांजळे या परिसरातील शेतकऱ्यांना कर्जत येथील तहसील कार्यालयात सुनावणीसाठी बोलावले होते. (वार्ताहर)
गॅस पाइपलाइन सुनावणी थांबली
By admin | Published: January 18, 2016 2:12 AM