उरण येथील अदाणींच्या आयओटीएल विरोधात धुतुम ग्रामस्थांचे गेट बंद आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 05:18 PM2024-01-05T17:18:41+5:302024-01-05T17:19:28+5:30
तीन तास वाहतूक बंद , भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या विरोधातही मुर्दाबादच्या जोरदार घोषणााबाजी.
मधुकर ठाकूर , उरण : धुतुम -उरण येथील अदाणीच्या इंडियन ऑईल अदानी वेंचर्स कंपनी विरोधात शुक्रवारी (५) धुतुम ग्रामस्थांनी गेट बंद आंदोलन केले .या आंदोलनामुळे कंपनीतील तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी भाजपचे आमदार महेश बालदी यांच्या विरोधातही मुर्दाबादच्या जोरदार घोषणा दिल्या.याप्रकरणी पोलिसांनी सरपंच,सदस्य, ग्रामस्थ,महिलांसह सुमारे २० जणांना ताब्यात घेतले आहे.
धुतुम येथील अदाणीच्या इंडियन ऑईल अदानी वेंचर्स कंपनीत मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय कामगारांची भरती केली जात आहे.याविरोधात संतप्त झालेल्या भुमीपुत्रांनी धुतुम ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली २० नोव्हेंबर रोजी सर्व पक्षियांनी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला होता.सलग ९
दिवसांच्या आंदोलनानंतर इंडियन ऑईल अदानी वेंचर्स व्यवस्थापनाने नांगी टाकून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली होती.चर्चेत जानेवारीच्या ५ तारखेला पाच तर जानेवारी अखेरपर्यंत पाच असे एकूण १० स्थानिक कामगारांना ठेकेदारी पध्दतीवर कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते.कंपनीच्या आश्वासनानंतर शुक्रवारी (५) पाच कामगार कंपनीच्या गेटवर गेले होते.मात्र तहसीलदार, भाजपचे आमदार महेश बालदी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाली.
झालेल्या चर्चेत धुतुम येथील शेमटीखार विभागातील कामगारांनाही भरतीत प्राधान्य देण्याची मागणी करीत येथील कामगार भरती प्रक्रिया स्थगित करण्याची भूमिका आमदार महेश बालदी यांनी मांडली.त्यामुळकामगार भरती करण्यात येणार नसल्याचे सांगत गेटवर कामासाठी गेलेल्या पाचही कामगारांना कंपनी व्यवस्थापनाने माघारी धाडले असल्याची माहिती धुतुम महिला सरपंच सुचिता ठाकूर यांनी दिली.
त्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी धुतुम ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली इंडियन ऑईल अदानी वेंचर्स कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गेट बंद आंदोलन केले.या आंदोलनामुळे कंपनीतील द्रव पदार्थ व रसायनांच्या टॅकरची वाहतूक सुमारे तीन तास बंद पडली.यावेळी कंपनी विरोधात जोरदार घोषणाबाजी करतानाच भाजपचे आमदार महेश बालदी यांच्याही विरोधातही स्थानिकांनी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.मात्र आंदोलनकर्ते
पोलिसांनाही जुमानले नाहीत.त्यामुळे पोलिसांनी २० आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.यामध्ये महिला सरपंच सुचिता ठाकूर यांच्यासह ४ महिला सदस्याआणि तीन सदस्यांचा समावेश असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.
इंडियन ऑईल अदानी वेंचर्स कंपनीची सुरू असलेली दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. याप्रकरणी ग्रामस्थांशी लवकरच चर्चा करून कंपनीचेकामकाज बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती ग्रामपंचायत सरपंच सुचिता ठाकूर व सदस्य प्रेमनाथ ठाकूर यांनी दिली.