माथेरान प्रवेशद्वारावरील गेट सील, अवैध वाहतूक रोखण्यासाठी नगरपालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 04:10 AM2019-03-20T04:10:39+5:302019-03-20T04:11:08+5:30
माथेरानमध्ये असलेल्या वाहनबंदी कायद्याचे उल्लंघन करण्याच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ पाहता, माथेरान नगरपालिकेने माथेरानच्या प्रवेशद्वारावरील दोन्ही गेट सील केली आहेत.
माथेरान : माथेरानमध्ये असलेल्या वाहनबंदी कायद्याचे उल्लंघन करण्याच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ पाहता, माथेरान नगरपालिकेने माथेरानच्या प्रवेशद्वारावरील दोन्ही गेट सील केली आहेत. यामुळे अवैध वाहतुकीस तर आळा बसेल; पण येथील अत्यावश्यक सेवा म्हणून असलेल्या रुग्णवाहिकेस मात्र अडचणीचे ठरणार आहे.
माथेरान हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील ठिकाण आहे. येथे पूर्ण वाहनबंदी कायदा लागू आहे. त्यामुळे माथेरानमध्ये फक्त रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना परवानगी आहे. तसेच येथे वाहनप्रवेशास बंदी आहे. येथील स्थानिक अश्वपाल संघटना वाहनबंदीसाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे, त्यांनी वाहन प्रवेशास नेहमीच प्रखर विरोध दर्शविला आहे. मात्र, मागील दोन महिन्यांपासून माथेरानमध्ये एमएमआरडीच्या माध्यमातून येथील रस्ते व प्रेक्षणीय स्थळांच्या सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात झाली आहे. त्यात वाहन कायदा मोडला गेल्याची अश्वपाल संघटनेने तक्र ार केली आहे. त्यानंतरही वाहने गावात येत असल्याचे बोलले जात आहे. आज माथेरानमध्ये येथील मायरा पॉइंट, पॅनोरमा पॉइंट, हार्ट पॉइंट व गावातील रस्त्यांची कामे सुरू आहेत. गावातील रस्त्यांवर स्थानिकांचे लक्ष असते. मात्र, पॅनोरमा पॉइंट येथे थेट वाहनातून कच्च्या मालाची वाहतूक केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे असून ज्या ठिकाणावरून ही वाहतूक होते तिथे कायमस्वरूपी नगरपालिकेने एक कर्मचारी नियुक्त केलेला आहे, तरीही ही वाहतूक राजरोसपणे सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दस्तुरीनाका येथील दोन्ही गेट पालिकेने सील केल्यामुळे तात्पुरता हा प्रश्न मिटणार आहे; परंतु हे गेट अर्धवट आहेत, त्यामुळे पूर्णस्वरूपी हा तोडगा नसून येथे भव्य गेट उभारून कायमस्वरूपी कर्मचारी असायला हवा, अवैध मालवाहतूक करणाऱ्यांवर पालिकेने पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली आहे; पण माथेरान पालिकेने फक्त औपचारिकता दाखवून अंग झटकल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पालिकेने हे गेट सील केल्यामुळे येथील अत्यावश्यक सेवा असलेल्या १०८ रुग्णवाहिकेला त्याचा फटका बसणार आहे, तसेच परिणामी स्थानिक नागरिकांना त्रास होणार आहे.
वारंवार होतेय कायद्याचे उल्लंघन
माथेरान हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द आहे, येथील गारवा टिकावा आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे, यासाठी येथे वाहन बंदी कायदा येथे लागू करण्यात आला आहे. मात्र, या कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्याने नगरपालिके ने प्रवेशद्वारावरील गेट सील के ले आहे.
अवैध वाहतूक रोखण्याकरिता पालिकेने हे पाऊल उचलले असून, रुग्णवाहिकेसाठी हा कायदा शिथिल होईल; पण वाहनबंदी कायदा मोडणाऱ्यांवर कारवाई होणारच.
- रामदास कोकरे, मुख्याधिकारी, माथेरान