वादळ शमल्याने गेटवे - एलिफंटा लॉन्च सुरू, मासेमारीही पूर्ववत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 08:46 AM2022-08-14T08:46:38+5:302022-08-14T08:47:31+5:30
मागील पाच दिवसांपासून वादळ, खराब हवामानामुळे डोंगराएवढ्या लाटा, ६५ ते ७० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, जोरदार पाऊस यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता.
उरण : तीन नंबरचा बावटा उतरविण्यात आल्याने गेटवे - एलिफंटा, गेटवे - जेएनपीए, मोरा - भाऊचा धक्का, करंजा - रेवस या मार्गांवरील सागरी वाहतुकीबरोबर शनिवारपासून मासेमारीही पूर्ववत सुरू झाली आहे.
मागील पाच दिवसांपासून वादळ, खराब हवामानामुळे डोंगराएवढ्या लाटा, ६५ ते ७० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, जोरदार पाऊस यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. त्यामुळे विविध बंदरांत खबरदारीची उपाययोजना म्हणून धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. या धोक्याच्या इशाऱ्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून गेटवे - एलिफंटा प्रवासी सेवा खंडित झाल्याने या सागरी मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची गैरसोय झाली होती. धोक्याच्या इशाऱ्यानंतर या सागरी मार्गावरील प्रवासी, पर्यटक वाहतूक कोलमडली होती.
तीन नंबरचा बावटा आता उतरविण्यात आला आहे. त्यामुळे शनिवारपासून सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. तसेच मासेमारी बोटीही रवाना झाल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली. वाहतूक पूर्ववत झाल्याने प्रवासी आणि पर्यटक यांना मोठा दिलासा मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
मासेमारीवरही विपरीत परिणाम
खराब हवामानामुळे मासेमारीवरही विपरित परिणाम झाला होता. धोक्याच्या इशाऱ्यानंतर स्थानिक मासळी बाजारात मिळेनाशी झाली. गेटवे - एलिफंटा दरम्यान पर्यटक वाहतूक कोलमडली होती. पर्यटकांअभावी बेटावरील व्यावसायिकांना आर्थिक नुकसानाला सामोरे जाण्याची वेळ आली होती.