गेटवे-मांडवा सागरी प्रवासी वाहतूक होणार बारमाही
By admin | Published: January 31, 2017 02:04 AM2017-01-31T02:04:05+5:302017-01-31T02:04:05+5:30
अलिबागहून बसने मांडवा जेट्टी आणि तेथून पुढे गेटवे-आॅफ इंडिया मुंबई ही अवघ्या दोन तासांची सागरी प्रवासी वाहतूक यंदापासून बारमाही सुरू राहणार आहे.
- जयंत धुळप, अलिबाग
अलिबागहून बसने मांडवा जेट्टी आणि तेथून पुढे गेटवे-आॅफ इंडिया मुंबई ही अवघ्या दोन तासांची सागरी प्रवासी वाहतूक यंदापासून बारमाही सुरू राहणार आहे. त्यासाठी आवश्यक मांडवा जेट्टीसमोरच्या समुद्रात ‘ब्रेक वॉटर वॉल’चे काम महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून सुरू करण्यात आले असल्याची माहिती आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी ‘लोकमत’ला दिली.
केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ९० कोटी रुपयांचा निधी या कामाकरिता उपलब्ध करून देण्यात आला असून, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या माध्यमातून या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’चे काम प्रत्यक्षात सुरू झाले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. समुद्रात बांधण्यात येत असलेल्या या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’करिता मोठ्या प्रमाणात मोठे दगड आवश्यक असतात, ते मांडवा येथे बोटीच्या माध्यमातून आणण्यात येत आहेत. आमदार जयंत पाटील यांनी या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’करिता पाठपुरावा केल्यावर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या ‘मांडवा ब्रेक वॉटर वॉल’चे महत्त्व विचारात घेऊन त्यास मान्यता दिली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खारलॅण्ड मंत्री अॅड. दत्ता खानविलकर यांनी ‘मांडवा बे्रक वॉटर वॉल’ची संकल्पना वीस वर्षांपूर्वी सर्वप्रथम मांडली होती. खोल समुद्रातील वेगवान लाटा भरतीच्या वेळी थेट मांडवा किनाऱ्यांवर येऊन आदळतात. पावसाळ्यात धरमतर खाडीमार्गे वेगाने समुद्रात येणारे पावसाचे पाणी यामुळे मांडवा जेट्टीसमोरील समुद्रात तात्पुरत्या ‘सागरी भोवऱ्यां’ची निर्मिती होते. आणि या भोवऱ्यात प्रवासी बोट भरकटून अपघातांची शक्यता असल्याने पावसाळ्यातील जून, जुलै आणि प्रसंगी पावसाचा जोर विचारात घेता आॅगस्ट अशा दोन ते तीन महिन्यांच्या काळात येथील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येत असे.
या नैसर्गिक समस्येवर मात करून पावसाळ्यातील या दोन-तीन महिन्यांच्या कालावधीतही मुंबई गेटवे ते मांडवा (अलिबाग) यादरम्यानची सागरी प्रवासी वाहतूक सुरक्षितरीत्या सुरूठेवण्याकरिता मांडवा जेट्टीच्या समोरील खोल समुद्रात
उत्तर-दक्षिण अशी मांडवा सागरी किनारा यामध्ये दगडी भिंत बांधण्याची संकल्पना होती. सागरी
दगडी भिंतीमुळे, मांडवा जेट्टीला प्रवासी बोटी लागताना त्या पाण्याच्या भोवऱ्यात हेलकावणार नाहीत
आणि जेट्टीच्या भिंतीवर आदळून अपघातांची शक्यता शिल्लक राहाणार नाही.
पावसाळी पर्यटनात १ लाख ५०० पर्यटकांची वाढ शक्य
-----
- गेटवे आॅफ इंडिया (मुंबई) ते मांडवा (अलिबाग) या सागरी मार्गावर प्रतिदिन प्रवासी संख्या दोन हजार आहे. वार्षिक प्रवासी संख्या १० लाखाच्या वर आहे. मुंबई-अलिबागदरम्यानचा अत्यंत सोईचा आणि अल्पवेळ प्रवासी मार्ग म्हणून अलिबाग परिसरातून सुमारे ७०० ते ८०० लोक यामार्गे दररोज नोकरी व अन्य व्यावसायिक कारणास्तव ये-जा करीत असतात. आता त्यांची पावसाळ्यातील अडचणही दूर होऊ शकतील.
- पावसाळ्याच्या दोन ते अडीच महिन्यांच्या काळात सुमारे १ लाख ५० हजार पर्यटक प्रवाशांची वाढ आता होऊ शकणार असल्याने, बारमाही पर्यटन व्यवसाय अलिबाग ते मुरुड या किनारपट्टीत होऊ शकणार आहे. सद्य:स्थितीत ५०० खासगी बोटी मांडवा किनारी असतात. या बोटींवरील दररोजच्या
एकूण ६ हजार कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून मांडवा परिसरातील बाजार-व्यापार वृद्धिंगत होऊ शकणार असल्याने स्थानिकांना नव्या व्यावसायिक संधीदेखील उपलब्ध होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.