गाठेमाळ आदिवासी ठाकूरवाडी मूलभूत सुविधांपासून वंचित, ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 02:02 AM2019-11-27T02:02:53+5:302019-11-27T02:03:13+5:30

 डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात गर्भवती महिला व रुग्णांना डोली करून नेण्याची नामुष्की ओढवते, यासारखे दुर्दैव कोणते? सरकारी सुविधा, योजनांचा लाभ आमच्या गावाला नाही.

Gathemal tribal Thakurwadi deprived of basic facilities | गाठेमाळ आदिवासी ठाकूरवाडी मूलभूत सुविधांपासून वंचित, ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा

गाठेमाळ आदिवासी ठाकूरवाडी मूलभूत सुविधांपासून वंचित, ग्रामस्थांनी मांडल्या व्यथा

Next

- विनोद भोईर

पाली  -  डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या भारतात गर्भवती महिला व रुग्णांना डोली करून नेण्याची नामुष्की ओढवते, यासारखे दुर्दैव कोणते? सरकारी सुविधा, योजनांचा लाभ आमच्या गावाला नाही. मजुरी करून आम्ही मुलांना शिकवतो. मात्र, शिकलेली मुले घरी बसून आहेत. उत्पन्नासाठी हळद व कणक लागवड करतो. यातून काही उत्पन्न मिळते. मात्र, शेती करावी तर लहरी पावसाने पिकाचे मोठे नुकसान होते. ती नुकसानभरपाई मिळत नाही. यामुळे जगावे की मरावे, असा प्रश्न आम्हाला पडतो, अशी खंत गाठेमाळ आदिवासी ठाकू रवाडीतीलहेमंत ठोंबरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. देशाला स्वातंत्र मिळून ७० वर्षांचा प्रदीर्घ कालावधी उलटला तरी आजही गाव, खेड्यापाड्यात, आदिवासीवाड्या, वस्त्यात विकासाची किरणे पोहोचली नसल्याचे वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. सुधागड तालुक्यातील जांभुळपाडा ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी ठाकूर, कातकरी समाजबांधव आजही मूलभूत सुविधा व शासनाच्या महत्त्वाच्या योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. प्राथमिक व पायाभूत नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने आदिवासी ठाकूर बांधवांनी याबाबत तीव्र नाराजी व संताप व्यक्त केला आहे.

वामन मोरे यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक ते दाखले उपलब्ध होत नसल्याने त्यांना मोठ्या अडचणी व समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आजही दुर्गम दुर्लक्षित भागातील गोरगरीब आदिवासी समाज बांधव अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा, तसेच शिक्षण, आरोग्य, रोजगार व अन्य मूलभूत सेवा सुविधापासून वंचित आहे. आदिवासी समाज बांधवांचा सर्वांगीण विकास साधला जावा, या दृष्टीने शासन योजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. गाठेमाळसह अन्य आदिवासीवाड्या-पाड्यातील नागरिकांना लवकरात लवकर मूलभूत सेवा सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी येथील आदिवासी समाजाकडून होत आहे.

या वेळी बारकी घोगरेकर या वृद्ध महिलेने रस्ते, पाणी व वीज तसेच स्मशानभूमी शाळा यांची सोय नसल्याचे सांगून आम्हाला पिढ्यान्पिढ्या मरणयातना सोसाव्या लागत असल्याचा संताप व्यक्त केला. तसेच काही महिलांनी पाण्यासाठी कोसो दूर वणवण भटकावे लागते, असे सांगितले. गाठेमाळ आदिवासी ठाकूरवाडीतील ग्रामस्थांनी ‘लोकमत’कडे आपल्या व्यथा मांडल्या. येथील आदिवासी कातकरी व धनगर बांधवांविषयी महालू दामा वारे यांनी, रानावनात वसलेले समाज बांधव देशाला स्वातंत्र्य मिळूनही जणू पारतंत्र्यात जगत आहेत. खडतर व दगडगोट्यांच्या रस्त्याने गर्भवती व रुग्णांना दवाखान्यात झोळी करून नेताना रस्त्याअभावी प्राण गमवावे लागतात, अशी व्यथा मांडली.

पुढाऱ्यांची केवळ आश्वासने
निवडणुकीच्या काळात मतदानाला नेण्यासाठी एकदिवस पुढारी गाड्या आणतात व नंतर दिलेले आश्वासन पाळत नाहीत. या ठिकाणी रस्ता, वीज व पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आम्हाला घरकुलाचा लाभही देत नाहीत. बाजारभाव वाढला आहे अशातच रोजगार नाही, दोन दिवस काम करतो, यातून भागवून घेतो. घरात मीठ आहे तर मिरची नाही, अशी परिस्थिती आहे.

निवडणुका आल्या की, मतांवर डोळा ठेवून गोंजारले जाते. मात्र, या काळात दिलेल्या आश्वासनांची पुढे पूर्तता होताना दिसत नसल्याची खंत व नाराजी महालू वारे यांनी व्यक्त केली. रमेश पवार यांनी विकासाचा स्रोत वाड्यावस्त्यात पोहोचत नाहीत. कष्टप्रद व हलाखीचे जीवन आदिवासी बांधवांच्या वाट्याला आले आहे. रोजगारासाठी स्थलांतराचा प्रश्न गंभीर आहे. स्थलांतरामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शासनाने स्थलांतर रोखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करावी, अशी मागणी पवार यांनी केली.

आम्हाला पाण्यासाठी खूप लांब जावे लागते. अशातच मोठा चढ-उतार करून डोक्यावर पाणी आणताना दमछाक होते. उन्हाळ्यात पाण्याचा दुष्काळ जाणवतो. काशी दामा वारे यांनी सांगितले की, माझ्या घरात सहा माणसे आहेत. मुलाबाळांना नोकरी धंदा नाही. गॅस नसल्याने जंगलात जाऊन लाकड आणावी लागतात. शेती करून जगावे लागते. यंदा पिकाची नासाडी झाल्याने जगायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. विद्यार्थ्यांनी खडतर रस्त्यामुळे शाळेत पायी चालत जाताना प्रचंड त्रास होतो.

- तुळशी वारे, ज्येष्ठ महिला ग्रामस्थ
गाठेमाळ आदिवासी ठाकूरवाडीत नेटवर्क समस्या गंभीर आहे. त्यामुळे महत्त्वाचे निरोप देताना असंख्य अडचणी येतात. रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी माहिती व महत्त्वाचे निरोप देता येत नाहीत. वीजसमस्येबरोबरच मोबाइल नेटवर्कची समस्या अधिक डोकेदुखी ठरत आहे. याचा आम्हाला खूप त्रास होतो. एखादा महत्त्वाचा फोन लावण्यासाठी जांभुळपाडा गावात तीन किलोमीटर चालत जावे लागते.
- अशोक सूतक / मोहन निरगुडे, तरुण

Web Title: Gathemal tribal Thakurwadi deprived of basic facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड