फणसाड अभयारण्यात रानगव्यांचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 11:53 PM2019-03-26T23:53:21+5:302019-03-26T23:53:37+5:30

तालुक्यातील फणसाड अभयारण्यात १२ रानगवे आढळले असून यापूर्वी कधीही असे रानगवे दृष्टीस पडले नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. फणसाड अभयारण्यात प्रथमच रानगवे आल्याने पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरणार आहेत.

Gaur arrival in Phansad Wildlife Sanctuary | फणसाड अभयारण्यात रानगव्यांचे आगमन

फणसाड अभयारण्यात रानगव्यांचे आगमन

googlenewsNext

- संजय करडे

मुरुड : तालुक्यातील फणसाड अभयारण्यात १२ रानगवे आढळले असून यापूर्वी कधीही असे रानगवे दृष्टीस पडले नसल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. फणसाड अभयारण्यात प्रथमच रानगवे आल्याने पर्यटकांसाठी हे आकर्षण ठरणार आहेत.
मुरुडपासून अवघ्या १४ किलोमीटर अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्याचे क्षेत्रफळ ५४ चौ.कि.मी. आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे महाबळेश्वर, माथेरान यासारख्या उंच टापूत आढळणाऱ्या वनस्पती येथे पाहायला मिळतात. अभयारण्यात बिबट्या, रानमांजर, सांबर, वानर, भेकर, रानडुक्कर, साळींदर, पिसोरी व मोठी खार अर्थात शेकरू, बिबटे आदी वन्यप्राणी आढळतात. तर सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग, अजगर, मण्यार, फुरसे, घोणस, हरणटोळ, धामण आदी सर्पांच्या जाती आढळतात.
या जंगलात मोठ्या प्रमाणात ऐन, साग, किंजळ, सावर, कुंभी, भोकर, पांगारा, पायर, करंज, हेद, काजू, डंबर, खवस, कोकम, जारूळ, मोहा, कळंब, अर्जुन आदी वनसंपदा येथे आहे. येथे मोठ्या प्रमाणावर औषधी वनस्पती आढळतात. बारमाही नैसर्गिक झरे आहेत. ग्रामीण बोलीत त्याला गाण असे म्हणतात. अशा सुमारे २७ गाण आहेत. याबरोबरच आता फणसाड अभयारण्यात रानगवेसुद्धा आढळून आले आहेत. या अभयारण्यात या पूर्वी कधीही रानगवे नव्हते; परंतु अचानक त्यांची पैदास वाढलेली दिसून येत आहे. म्हशीसारख्या काळ्या; परंतु यांच्या पायाखालील सफेद भाग तसेच यांच्या शेपटीला सफेद केस असतात. खूप वजनी व प्रचंड खाद्य खाणारे असे रानगवे आहेत. या अभयारण्यात किमान १२ रानगवे आढळून आल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले.

- हे रानगवे कळपात राहणे अधिक पसंत करतात. वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीमधील काही जंगल भागात हे रानगवे आढळून आले आहेत. आकाराने खूप मोठे असल्याने सर्वसामान्य नागरिक घाबरून जातात. फणसाड अभयारण्यात प्रथमच रानगवे आल्याने पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहेत. शेकरू या दुर्मीळ प्राण्यांबरोबरच आता या जंगलात रानगवे सापडल्याने पर्यटक व वनविभागाने समाधान व्यक्त केले आहे.

ज्या जंगलात सधनता असते अशा वेळी रानगवे राहणे अधिक पसंत करतात. फणसाड अभयारण्य दाट असून येथे अनेक मोठे वृक्ष आहेत. तसेच पिण्याचे पाणी सुद्धा मुबलक आहे. आतापर्यंत आमच्या पाहणीत किमान आठ रानगवे आढळून आले आहेत. मात्र, येथील ग्रामस्थांकडून १२ रानगवे निदर्शनास आल्याचे समजले आहे.
- प्रदीप चव्हाण,
वन परिक्षेत्र अधिकारी, फणसाड

Web Title: Gaur arrival in Phansad Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड