जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील १२ गुणवंतांचा उद्या गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 12:13 AM2019-01-02T00:13:43+5:302019-01-02T00:13:55+5:30
रायगड जिल्ह्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजवित असलेल्या १२ गुणवंतांचा गुरुवार, ३ जानेवारी ‘लोकमत’ रायगड कार्यालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार करण्यात येणार आहे.
अलिबाग : रायगड जिल्ह्यात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजवित असलेल्या १२ गुणवंतांचा गुरुवार, ३ जानेवारी ‘लोकमत’ रायगड कार्यालयाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार करण्यात येणार आहे. येथील पी.एन.पी. नाट्यगृहात संध्याकाळी ५.३० वाजता आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते ‘लोकमत-लोकगौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या वेळी शुभा जोशी प्रस्तुत ‘महाराष्ट्राची गीतगंगा’ ही बहारदार संगीत मेजवानी रसिकांना लाभणार आहे.
‘लोकमत-लोकगौरव’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या गुणवंतांमध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचा सहकार महर्षी पुरस्कार प्राप्त आणि रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, जिल्हा प्रशासनातील कामांना अत्यंत गतिमान ठेवण्यात यशस्वी रायगडचे निवासी उप जिल्हाधिकारी किरण पाणबुडे, रायगड पोलीस दलाच्या ‘सीसीटीएनएस’ या पोलीस कामकाजाच्या आॅनलाइन यंत्रणेत प्रभावी कार्यरत पोलीस नाईक जयेश विलास पाटील, अलिबाग, भायमळा सारख्या छोट्याशा गावांतून उद्योगास प्रारंभ करून सद्यस्थितीत जगभरातील २२ देशांत ‘फायबर ग्लास रिएन्सफोर्समेंट इक्विपमेंट’ निर्यात करून देशाला मोठे परकीय चलन मिळवून देण्यात यशस्वी उद्योजक अनिल म्हात्रे यांचा समावेश आहे.
देशातील पहिले ‘व्हल्चर फूड रेस्टॉरंट’ कार्यान्वित करून गिधाडांचे संवर्धन करण्यात यशस्वी महाड येथील पर्यावरणतज्ज्ञ प्रेमसागर मेस्त्री, सात हजार महिला बचतगटांच्या माध्यमातून ७० हजार महिलांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या जिल्हा महिला बचतगट महासंघाच्या अध्यक्षा चित्रलेखा नृपाल पाटील, आदिवासीमधील अंधश्रद्धा निर्मूलन आणि आदिवासी विद्यार्थी शिक्षण याकरिता तीन आदिवासी आश्रमशाळांच्या माध्यमातून प्रभावी कार्यरत आदिवासी सेवक रवींद्र लिमये, राष्ट्रीयस्तरावरील तसेच सरकारी रांगोळी स्पर्धांमध्ये विविध पारितोषिकांचे मानकरी रोहा येथील रांगोळी कलाकार संदीप जठारी, ‘कॅन्सर’ या दुर्धर आजारावर जिद्दीने मात करून रायगड जिल्हा सरकारी रुग्णालयातील डायलेसिस युनिट पूर्ण वेळ सांभाळून आगळा वस्तुपाठ घालून देणाºया डॉ. दीपाली वैभव देशमुख, पेण येथील गुणवंत गणेशमूर्तिकार दीपक समेळ, गोरेगाव-माणगाव येथील राष्ट्रीय नेमबाज सौरभ दळवी आणि कर्जत-खालापूरच्या दुर्गम भागातील आदिवासी मुलांच्या कुपोषणमुक्तीसाठी सक्रिय कार्यरत दिशा केंद्र स्वयंसेवी संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अशोक जंगले यांचा समावेश आहे.