जिल्ह्यात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप, विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 11:14 PM2019-09-07T23:14:35+5:302019-09-07T23:14:51+5:30

ढोल-ताशा, डीजेच्या तालावर मिरवणुका; समुद्र, तलाव, नदी, खाड्यांवर चोख बंदोबस्त

Gauri-Ganapati Visarjan in the Raigad district | जिल्ह्यात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप, विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी

जिल्ह्यात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप, विसर्जनस्थळी भाविकांची गर्दी

Next

अलिबाग : रायगड जिल्ह्यात शनिवारी ७२ हजार २२७ गौरी-गणेशमूर्तींना भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. यात ९३ सार्वजनिक, तर ५७ हजार ९४७ घरगुती गणेशमूर्तींचे आणि १४ हजार १८७ गौरीच्या मूर्तींचे समुद्र, तलाव, नदी या ठिकाणी विसर्जन करण्यात आले.

बाप्पाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यांच्या जोडीला ढोल-ताशाचा गजर आणि डीजेच्या दणदणाटाने परिसर चांगलाच दुमदुमून गेला होता. अधूनमधून पाऊस पडत असतानाही गणेशभक्त बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये तल्लीन होऊन नाचत होते. विसर्जनस्थळी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याने जत्रेचे स्वरूप आले होते.

गेले सहा दिवस बाप्पाच्या आगमनाची धूम गणेशभक्तांच्या घरामध्ये सुरू होती. आप्तेष्ट, मित्रमंडळी असा लवाजमा बाप्पाच्या आगमनाने चांगलाच खूश झाला होता. अनेकांनी जागरण करून विविध खेळ, गाणी, नाच-मस्तीने रात्र जागवून काढल्या. सायंकाळी ४ नंतर बाप्पाला विसर्जनस्थळी नेण्यास सुरुवात झाली. कोणी टाळ-मृदुंगाचा गजर करीत, तर कोणी डीजेच्या तालावर धमाल मस्ती करत बाप्पाला निरोप दिला.

महाडमधील भोईवाडा, पेटकरअळी, परिटअळी, गणेशनगर, जाधववाडी, न्हावीकोंड, दासगांवकर वाडी, बामणे कोंड, आणि वांद्रेकोड या नऊ वाड्यांमध्ये मोठ्या आनंदात गणेश उत्सव साजरा करण्यात आला. गावातील या वाड्यांमधील गणेश मूर्तींचे गावालगतच्या नदीवर तर पेटकर आळी आणि भोईवाडा येथील मूर्तींचे सावित्री खाडीत विसर्जन करण्यात आले.

विसर्जनस्थळी धार्मिक कार्यक्रम
मोहोपाडा तलाव, पाताळगंगा नदी, रिस पूल, कांबे गणेशघाट, वावेघर गणेशघाट, गुळसुंदे-पाताळगंगा नदीपात्र, वाशिवली, लोहोप, कासपनदीपात्र, तळेगाववाडी गणेशघाट आदी ठिकाणी भजन गाऊन पाच दिवसांच्या शेकडो गणेशमूर्तींचे तर गौराईमूर्तींचे पाताळगंगा नदीवर विसर्जन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जागोजागी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. बाप्पाला निरोप देताना लहान मुलांसह कुटुंबातील सदस्य भावूक झाले होते.

गणेश आगमनापासून कोसळणाऱ्या पावसाने शनिवारीही सायंकाळी हजेरी लावल्याने विसर्जन सोहळ्यात नागरिकांची तारांबळ उडाली. मात्र, लाडक्या एकदंताला निरोप देताना भाविकांचा कंठ दाटून आल्याचे चित्र विसर्जनस्थळी पाहावयास मिळाले. मोहोपाडा येथील तलावावर पाच दिवसांच्या ४०० पेक्षा जास्त गणरायमूर्तींचे तर पाताळगंगा नदीवर ३०० पेक्षा जास्त गौराईचे विसर्जन करण्यात आले. भजन-कीर्तन, पूजा, अर्चा अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल या वेळी पाहायला मिळाली.

ठिकठिकाणी चोख बंदोबस्त
च्पाली : गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकरच या... अशा जयघोषात सुधागडकरांनी पाच दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. सायंकाळपर्यंत अनेक घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी पाली पोलिसांकडून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पाली, राबगाव, रासळ, पेडली, जांभुळपाडा, परळी, करचुंडे अंबानदी येथे गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती.

आसमंतात घुमणारा शंखनाद, फुलांची उधळण, ढोल-ताशांचा दणदणाट, बाप्पा मोरयाचा जयघोष करत, वरुणराजाच्या साक्षीने भक्तांनी साश्रू नयनांनी गौरी-गणरायाला निरोप दिला. विसर्जन सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी पाली पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक ठिकठिकाणी तैनात करण्यात आले होते. या वेळी पाली तहसीलदार दिलीप रायन्नावर हेदेखील उपस्थित होते.

Web Title: Gauri-Ganapati Visarjan in the Raigad district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.