गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 04:02 AM2018-09-18T04:02:46+5:302018-09-18T04:03:22+5:30

पाच दिवसांच्या मुक्कामाला आलेल्या बाप्पाला गौरीसोबत सोमवारी भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला.

Gauri-Ganpatite emotional message! | गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप!

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप!

googlenewsNext

अलिबाग : पाच दिवसांच्या मुक्कामाला आलेल्या बाप्पाला गौरीसोबत सोमवारी भक्तिमय वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. या वेळी गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या..., गणपती गेले गावाला... चैन पडेना आम्हाला’ च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. जिल्ह्यामध्ये ९० सार्वजनिक, तर ५९ हजार ४३ घरगुतीबाप्पाच्या मूर्तींचे आणि १५ हजार ७०० गौरीच्या मूर्तींचे समुद्र, तलाव, नदी या ठिकाणी विसर्जन करण्यात आले. बाप्पाला निरोप देण्यासाठी जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. त्यांच्या जोडीला ढोलताशाचा गजर आणि डीजेच्या दणदणाटाने परिसर चांगलाच दुमदुमून गेला होता. गणेशभक्त बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये चांगलेच तल्लीन होऊन नाचत होते. विसर्जनस्थळी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
गेले पाच दिवस बाप्पाच्या आगमनाची धूम भक्तांच्या घरामध्ये सुरू होती. आप्तेष्ट, मित्रमंडळी, असा लवाजमा बाप्पाच्या सेवेत तल्लीन झाला होता. सोमवारी सायंकाळी ५ नंतर बाप्पाला विसर्जनस्थळी नेण्यास सुरुवात झाली. समुद्रकिनारे, तलाव, नदी अशा ठिकाणी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्या वेळी विविध ढोलताशा पथकांनी परिसर चांगलाच दणाणून सोडला होता.
जिल्ह्यातील पेण, रोहे, माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर या ठिकाणी गणेश विसर्जनाच्या मोठ्या मिरवणुका निघाल्या होत्या. त्या ठिकाणीही पारंपरिक सनई, खालुबाजा अशा वाद्यांनी मिरवणुकीत रंगत आणली होती. बहुतांश सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुकांमध्ये ढोलताशा पथकांचा समावेश करण्यात आल्याचे दिसून आले. वाहतुकीला अडथळा होऊ नये, यासाठी अलिबाग शहरामध्ये समुद्रकिनारी जाणारे मार्ग एका दिशेने केले होते. पोलिसांनी एन्ट्री पाइंटला बॅरीगेट्स लावल्याने अनावश्यक वाहनांना विसर्जनस्थळी जाण्यास मज्जाव केला होता.

नागोठणेत अंबानदी घाट, तलावांवर चोख बंदोबस्त
नागोठणे शहरासह विभागात आज गौरी आणि गणेशाचा भावपूर्ण वातावरणात विसर्जन सोहळा पार पडला. सोमवारी १ हजार ५५ गणेशमूर्ती आणि ३५० गौरींचे विसर्जन करण्यात आले. दुपारी ३.३०नंतर सुरू झालेला विसर्जन सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरू होता. शहरात जोगेश्वरी, तसेच शंकर मंदिरासमोरील दोन तलावांसह अंबा नदीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
अंबा नदीवरील घाटावर नागोठणे ग्रामपंचायतीच्या वतीने विसर्जन सोहळ्यासाठी येणाऱ्या गणरायासह गणेशभक्तांचे आदरपूर्वक स्वागत करण्यात येत होते. सोहळ्यानिमित्त नागोठणे पोलिसांच्या वतीने शहरात विविध ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

महाडमध्ये विशेष बंदोबस्त
महाड : महाडमध्ये पाच दिवसांच्या गणरायाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. शहरातील जाखमाता घाट, भोईघाट, राजघाट, रामघाट आदी ठिकाणी गणरायाचे ‘पुढल्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात विसर्जन करण्यात आले. अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. निर्माल्य गोळा करण्यासाठी नगरपरिषदेने विसर्जन घाटावर खास निर्माल्यकलश ठेवले होते. विसर्जन काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक शैलेश सणस, उपनिरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.

ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन सोहळ्याची सांगता
पेणमध्ये पाच दिवसांच्या गणरायाला साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला. लेझीम, ढोल, ताशा, नाशिक ढोलपथक, भजनी मंडळाच्या उपस्थितीत निघालेल्या मिरवणुकांनी विसर्जन सोहळ्याची सांगता झाली. तलाव, नदीघाट, खाड्यांमध्ये गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. पेणमध्ये चार हजार ५०० पाच दिवसांचे बाप्पा व गौरीचे विसर्जन झाले. पाचव्या दिवशी स्वगृही परतणाºया गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांना गर्दी उसळणार याची दक्षता घेऊन, पेण नगर प्रशासनाने स्वागतकक्ष व विसर्जन स्थळावर विसर्जन व्यवस्था चोख ठेवली होती. पोलीस प्रशासन व शांतता कमिटी सदस्य चौकाचौकांत मिरवणुकीतील गणरायाचे स्वागत करीत होते. विसर्जन स्थळांवर निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते. पेण शहरातील प्रभूआळी सार्वजनिक गणपती, चावडीनाका सार्वजनिक गणपती, या मंडळांच्या गणपतीच्या मिरवणुका व घरगुती बाप्पाच्या मिरवणुका टप्प्याटप्प्यांनी येत होत्या. कासार तलाव, विश्वेश्वर मंदिर घाट, भुंड्या पुलावरील विसर्जन घाट, तसेच नॅशनल हायवेनजीक भोगावती नदीघाट अशा ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनासाठी मोठी गर्दी उसळली होती. पेण शहरात पाच ठिकाणी विसर्जन स्थळे होती. तर ग्रामीण परिसरात नद्यांचे पात्र, खाड्यांचे पात्र, गावचे सार्वजनिक तलाव या ठिकाणांवर गणेशभक्तांची गर्दी दिसत होती.

गौरी-गणपतीच्या स्वागतासाठी विसर्जन घाटांवर पुष्पवृष्टी
कर्जत तालुक्यातील कर्जत, नेरळ व माथेरान पोलीसठाण्याच्या हद्दीतील एकूण ५९८० गणराय, २६०९ गौरीना निरोप देण्यात आला. तालुक्यातील कर्जत पोलीसठाण्याच्या हद्दीत ३८३० घरगुती व १३ सार्वजनिक गणेशमूर्ती, नेरळ पोलीसठाणे हद्दीत २०८३ घरगुती, एक सार्वजनिक, तर माथेरान पोलीसठाण्याच्या हद्दीत ५२ घरगुती आणि एक सार्वजनिक गणराय, अशा एकूण ५९८० गणेशमूर्तीं, २६०९ गौरी विसर्जन भक्तिमय वातावरणात करण्यात आले. कर्जतच्या मुस्लीम बांधवांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष व पदाधिकाºयांचे गुलाब पुष्प देऊन आलिंगन देत स्वागत केले, तर नेरळचे माजी सरपंच आयुब तांबोळी, जब्बार सय्यद आदी मुस्लीम बांधवांनी मशिदी समोरून जाणाºया गणेशमूर्तींवर पुष्पवृष्टी केली व नागरिकांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांच्या आतशबाजीने आसमंत दणाणून जात होते. पुढच्या वर्षी लवकर या, असे भावपूर्ण आवाहन करीत गणराया व गौरीचे विसर्जन करण्यात आले. कर्जत नगरपरिषद व नेरळ ग्रामपंचायतीने विसर्जन ठिकाणी चोख व्यवस्था ठेवली होती, तसेच काही ठिकाणी निर्माल्य नदीपात्रात टाकल्याने नदीतील पाणी खराब होऊ नये, तसेच पर्यावरण व्यवस्थित राहावे म्हणून श्रीसदस्यांनी निर्माल्य गोळा करून त्याचे खत करण्याच्या हेतूने खड्ड्यांमध्ये टाकले. कोणतेही गालबोट लागू नये, म्हणून पोलीस यंत्रणासुद्धा सज्ज होती.

Web Title: Gauri-Ganpatite emotional message!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.