गवळवाडी प्राथमिक सुविधांपासून वंचित
By admin | Published: March 10, 2017 03:44 AM2017-03-10T03:44:51+5:302017-03-10T03:44:51+5:30
महाड शहराच्या पश्चिमेस असलेल्या डोंगरावर केंबुर्ली गावची गवळवाडी आहे. सुमारे २० घरे असलेली ही गवळी समाजाची वस्ती महाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असली
- सिकंदर अनवारे, दासगाव
महाड शहराच्या पश्चिमेस असलेल्या डोंगरावर केंबुर्ली गावची गवळवाडी आहे. सुमारे २० घरे असलेली ही गवळी समाजाची वस्ती महाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असली तरी सोयी-सुविधांपासून ती कोसो दूर आहे. माणसाला राहण्यासाठी आवश्यक पिण्याचे पाणी आणि रस्ता या दोन्ही महत्त्वपूर्ण गरजा स्वातंत्र्याच्या साठीनंतर देखील येथे पूर्ण झालेल्या नाहीत. निसर्गरम्य अशा वातावरणात असलेल्या या गवळवाडीवरील लोक सुविधा नाहीत म्हणून स्थलांतर करू लागले आहेत.
महाड शहरालगत साहीलनगर आणि गांधारपाले गावाच्या डोंगरातून एक कच्चा रस्ता डोंगर माथ्याकडे जातो. मोठमोठ्या दगडी माती आणि जंगली झाडाझुडपातून जाणारा हा रस्ता शहरापासून केवळ तीन किमी असलेल्या गवळ वाडीवर जातो. स्वातंत्र्यापूर्वीपासून या ठिकाणी गवळी समाजाची वस्ती आहे. पारंपरिक शेती आणि दूध व्यवसाय करीत येथील ग्रामस्थ जीवन जगत आहेत. शासनाने विविध माध्यमातून दुर्गम भागातील वाड्या आणि वस्त्यांना सुविधा देण्याचा विडा उचलला असला तरी महाडमधील सर्वपक्षीय राजकारणी आणि लोकप्रतिनिधींचे या गवळवाडीकडे दुर्लक्ष होत आहे. केंबुर्ली गाव हद्दीमध्ये येणारी ही गवळवाडी केंबुर्ली ग्रामपंचायतीचा एक भाग आहे. या ठिकाणी २० घरे असली तरी केवळ ६ घरात ५० ते ५५ ग्रामस्थ येथे राहत असून उरलेली घरे बंद आहेत.
या वाडीवर जाण्यासाठी चांगला रस्ता नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, मुलांसाठी शाळा नाही, अशा विविध समस्यांनी ग्रस्त होवून येथील ग्रामस्थांनी हळूहळू वाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वच तरुण महाड शहर, मुंबई आणि पुणे येथे त्यांच्या कुटुंबासह सध्या वास्तव्य करीत असून केवळ वृद्ध या वाडीमध्ये राहत आहेत. सणवार किंवा लग्न समारंभासाठी हे चाकरमानी गावात आले तरी एक ते दोन दिवसापेक्षा जास्त वास्तव्य करीत नसल्याची खंत येथील वयोवृद्ध व्यक्त करत
आहेत.
केंबुर्ली ग्रामपंचायत हद्दीतील ही गवळवाडी असून आजपर्यंत कोणत्याच राजकीय पक्षांनी या गवळवाडीला ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व दिलेले नाही. वाडी दुर्गम भागात डोंगराच्या पठारावर वसलेली असल्याने या ठिकाणी पाण्यासाठी नैसर्गिक स्रोत उपलब्ध नाहीत. डोंगर कड्यावर केंबुर्ली गावाच्या वरील बाजूस टाका नामक ठिकाणावर पाणी आहे. मात्र गावातील काही माणसांच्या आडमुठेपणामुळे हे पाणी या वाडीवर योजनेसाठी वापरले जाऊ शकत नाही. पर्यायी घशाची कोरड भागवण्यासाठी डोंगर उतारावर सुमारे दोन किमी जावून हे वृद्ध पाणी आणत आहेत. पाण्यासोबत रस्त्यावरील विजेची सुविधा देखील गेली कित्येक वर्षांपासून येथे उपलब्ध नव्हती.
जंगल भाग कच्चा रस्ता आणि जनावरांची भीती अशा धोकादायक परिस्थितीमध्ये रात्रीच्या वेळी ग्रामस्थांना किमान वाडीवर पथदिव्यांची गरज भासत होती. तशी मागणी ही वाडीवरील ग्रामस्थ वारंवार करत होते. मात्र पोलवर दिवे कधी लावलेच नाही. मागील महिन्यात निवडणूक काळात या ठिकाणी पोलवर दिवे लावण्यात आले, मात्र ते दिवस-रात्र चालू राहत यामुळे पुन्हा काही दिवसातच अवस्था जैसे थे झाली आहे.
शिक्षणासाठी पायपीट
वाडीमधील सहा मुले प्राथमिक शिक्षणाकरिता नगर पालिकेच्या महाड येथील शाळेत येत आहेत. मात्र शिक्षणाकरिता दररोज सहा किमी डोंगर चढ-उताराची पायपीट आणि कसरत या मुलांना करावी लागत आहे.
११ वाजण्याच्या शाळेकरिता सकाळी ९ वा. या मुलांना घर सोडावे लागत असून तर संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही मुले घरी परत येतात. सहा किमीचा चढ-उतार केल्यानंतर दमलेल्या पायाने आणि शिणलेल्या मनाने ही मुले अभ्यास करत असून त्यांनी आजही शिक्षणाचा ध्यास सोडलेला नाही.
दुग्ध व्यवसाय अडचणीत
- ग्रामपंचायत आणि स्थानिक प्रतिनिधी राजकारण्यांच्या या दुर्लक्षासोबत निसर्गाने देखील गवळवाडीकडे कृपादृष्टी दाखवलेली नाही. मुंबईकर ग्रामस्थांनी गेले महिनाभरात वाडीवर तीन ठिकाणी बोअरिंग मारल्या. मात्र एकालाही पाणी लागलेले नाही. पाणी नसल्याने येथील दुग्ध व्यवसाय अडचणीत आला आहे. तर जंगली डुक्कर, भेकर आणि माकडांच्या उपद्रवामुळे पारंपरिक शेती देखील बंद करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली आहे.
- १० वर्षांपूर्वी या गवळवाडीला जोडणारा कोणताच रस्ता अस्तित्वात नव्हता. माजी आ. माणिकराव जगताप यांच्या कालखंडात त्यांनी गांधारपाले गाव हद्दीतून गवळवाडीला जोडणारा रस्ता तयार केला. मात्र पावसात हा रस्ता काही प्रमाणात वाहून जात असून वाडीवरील ग्रामस्थ श्रमदान करून या रस्त्याची डागडुजी करीत आहेत.
- चारचाकी जीप या प्रकारच्या गाड्या केवळ उन्हाळ्यातच मोठी कसरत करत वाडीवर जात असून दुचाकीस्वारांची या मातीच्या रस्त्यात प्रचंड तारांबळ उडते. रस्त्याची सुविधा नसल्याने बाजारहाटाचे सामान वाडीवर आणण्यासाठी येथील ग्रामस्थांना प्रचंड मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते.
- वाडीवर एखादी व्यक्ती आजारी पडली तर डोलीत बांधून त्याला गांधारपाले गावापर्यंत आणल्याशिवाय ग्रामस्थांकडे कोणताही पर्याय नसतो. यामुळे गरोदर महिला, अतिवृद्ध व्यक्तींना वाडीवर ठेवण्याचे टाळले जाते.