गोरेगावचा महावितरण अधिकारी लाच घेताना अटक
By राजेश भोस्तेकर | Published: July 19, 2023 08:50 PM2023-07-19T20:50:40+5:302023-07-19T20:51:05+5:30
तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी रायगड लाचलुचपत विभाग अलिबाग येथे येऊन तक्रार दाखल केली.
अलिबाग : राहते घराचे जवळ असलेला इलेक्ट्रिक पोल बदली करण्याकरिता व नवीन इलेक्ट्रिक पोल बसविण्यासाठी मागितलेल्या ७ हजार लाचे प्रकरणी गोरेगाव विभागातील महावितरणचे कार्यकारी अभियंता लाच लुचपत पथकाच्या जाळ्यात अडकले आहेत. गणेश तुकाराम पाचपोहे, वय 55 वर्षे असे लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. रायगड लाच लुचपत पथकाने ही कारवाई केली आहे.
तक्रारदार यांचे गोरेगाव येथे घर आहे. घराच्या जवळ महावितरण विभागाचा इलेक्ट्रिक पोल आहे. हा पोल हलवून त्याठिकाणी नवीन पोल बसविण्यासाठी तक्रारदार यांनी अर्ज केला होता. याबाबत आरोपी गणेश पाचपोहे यांना मंगळवारी १८ जुलै रोजी भेटून माहिती दिली. आरोपी पाचपोहे यांनी तक्रारदार यांच्याकडे या कामासाठी सात हजाराची मागणी केली. तक्रारदार यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी रायगड लाचलुचपत विभाग अलिबाग येथे येऊन तक्रार दाखल केली.
तक्रारदार यांच्या तक्रारी नुसार लाच लुचपत पथकाने पडताळणी करून सापळा रचला. बुधवारी आरोपी गणेश पाचापोहे यांनी तक्रारदार यांच्याकडून सात हजार रुपये स्वीकारताना पथकाने रंगेहाथ पकडले. पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाडावे, पोलीस निरिक्षक रणजीत गलांडे, स.फौ. अरुण करकरे, स.फौ. विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, पोलीस हवालदार कौस्तुभ मगर, पोलीस हवालदार विवेक खंडागळे, पोलीस नाईक सचिन आटपाडकर या पथकाने यशस्वी कारवाई केली.