आकले ग्रामपंचायतीमधील बोअरवेल पाण्यामधून जंतू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 06:28 AM2017-12-10T06:28:14+5:302017-12-10T06:28:21+5:30
महाड तालुक्यातील आकले ग्रामपंचायतीमध्ये बोअरवेलच्या पाण्यामधून जंतू आढळल्याची घटना घडली आहे. आकले ग्रामपंचायतीमधील मराठी आळी येथील बोअरवेलच्या पाण्यामधून जंतू बाहेर येत असल्याची घटना गेल्या चार दिवसांपासून घडत असल्याने, ग्रामस्थांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी बिरवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्र यांना लेखी निवेदन...
लोकमत न्यूज नेटवर्क
बिरवाडी : महाड तालुक्यातील आकले ग्रामपंचायतीमध्ये बोअरवेलच्या पाण्यामधून जंतू आढळल्याची घटना घडली आहे. आकले ग्रामपंचायतीमधील मराठी आळी येथील बोअरवेलच्या पाण्यामधून जंतू बाहेर येत असल्याची घटना गेल्या चार दिवसांपासून घडत असल्याने, ग्रामस्थांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी बिरवाडी प्राथमिक आरोग्यकेंद्र यांना लेखी निवेदन आणि सदर बोअरवेलच्या पाण्याचे नमुने तपासणीकरिता देऊन अहवाल मागितला. या बोअरवेलचे पाणी गावातील ग्रामस्थ पिण्याकरिता वापरत असल्याने त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत माहितीसाठी उपसरपंच, पाणी कमिटीचे सचिव प्रशांत खोपकर यांच्याशी संपर्क साधला असता, बोअरवेलच्या पाण्यामध्ये टीसीएल पावडर टाकण्यात आली आहे. मात्र, पाण्यामध्ये जंतू कोठून आले याचा शोध घ्यावा लागेल, असे सांगितले. आकले ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्यकेंद्राला दिलेल्या निवेदनाची प्रतमाहितीवर योग्य कारवाईकरिता गटविकास अधिकारी महाड तालुका आरोग्याधिकारी ग्रामपंचायत आकले यांना दिली आहे. या गावांमध्ये नळाला पाणी येत नसल्याने बोअरवेलवरील पाणी पिण्याकरिता वापरले जात असल्याची माहिती येथील महिलांनी दिली. अशा परिस्थितीत बोअरवेलच्या पाण्यामध्ये जंतू आढळल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली आहे.