तरुणांना रोजगार मिळवून देणार
By admin | Published: August 22, 2015 09:44 PM2015-08-22T21:44:47+5:302015-08-22T21:44:47+5:30
कोकणातील जनतेने मला सहा वेळा खासदार म्हणून निवडून दिले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सहा वेळा निवडून येणारा मी एकमेव खासदार आहे. पुढील येणाऱ्या दोन पिढ्या माझी आठवण
नांदगाव : कोकणातील जनतेने मला सहा वेळा खासदार म्हणून निवडून दिले. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून सहा वेळा निवडून येणारा मी एकमेव खासदार आहे. पुढील येणाऱ्या दोन पिढ्या माझी आठवण ठेवतील, असे कार्य मला करावयाचे आहे. रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत माझ्या खात्यामार्फत एक - एक उद्योग प्रस्थापित करून किमान दहा हजार तरुणांना नोकरी मिळेल याकडे मी विशेष लक्ष देणार आहे. कोकणात जास्तीत जास्त उद्योग आणून येथील रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आश्वासन शिवसेनेचे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिले आहे.
मुरुड नगरपरिषदेच्या मार्फत केंद्रीय मंत्री गीते यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत मिसाळ, उपजिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सुरेश पाटील, बांधकाम सभापती संजय गुंजाळ, माजी नगराध्यक्षा कल्पना पाटील, गटनेते महेश भगत, तहसीलदार संदीप पानमंद, मुख्याधिकारी वंदना गुळवे, शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद भायदे व सर्व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गीते म्हणाले की, मुरुड नगरपरिषदेमार्फत विविध विकासकामासाठी ३३ कोटी ७० लाखांच्या कामासाठी माझ्याकडे निवेदन दिले आहे. यातील बहुतांशी कामे पूर्ण झालेली असतील, असे चित्र काही दिवसात पाहावयास मिळेल. डिसेंबर महिन्यात होणाऱ्या पर्यटन महोत्सवासाठी केंद्रीय पर्यटन मंत्री यांना आमंत्रित केले जावे, अशा सूचनाही यावेळी त्यांनी केल्या. मुरुड तालुक्याला सीआरझेडचा प्रश्न सतावत आहे. सीआरझेडबाबत केंद्रीय पर्यावरण खात्याने काही नियम शिथिल केले आहेत, परंतु त्याबाबतचे परिपत्रक निघालेले नाही. मुरुड येथील पद्मदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी खुला व्हावा यासाठी पर्यावरण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. कोकणातील सागरी किनाऱ्यावर मूलभूत सुविधा पर्यटकांना मिळण्यासाठी एमटीडीसी व आयपीडीसी यांचे सुध्दा सहकार्य होणार असून नैसर्गिक वैभव वाढवून पर्यटकांचे लोंढे वाढणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.