माथेरान : माथेरान हे प्रदूषण विरहित पर्यटनस्थळ म्हणून जगप्रसिद्ध आहे. भौगोलिकदृष्ट्या अगदी छोटे पर्यटनस्थळ अशी माथेरानची ख्याती आहे. ब्रिटिश राजवटीत त्यांनी विरंगुळ्यासाठी माथेरानचा शोध लावला होता त्यावेळी त्यांनी फक्त त्यांच्या अधिकारी वर्ग व अतिमहत्त्वाच्या व्यक्ती डोळ्यासमोर ठेवून येथील कायदे व राहण्यासाठी भूखंड तयार केले होते. जे आजही अस्तित्वात आहेत व आज इतक्या वर्षांनंतरही त्याच भूखंडांवर माथेरानमधील हॉटेल व्यवसाय सुरु आहेत. मागील काही वर्षांमध्ये माथेरानकडे येणारा पर्यटकांचा ओघ वाढला आहे, त्यामुळे या जागा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळेच येथील स्थानिकांनी आपली पदरमोड करीत राहत्या वास्तूमध्ये लॉजिंग व्यवसाय सुरु केला आहे व माथेरानमध्ये येणाºया मध्यमवर्गीय पर्यटकांसाठी ही व्यवस्था फारच परवडणारी असल्याने हा व्यवसाय भरभराटीस येत आहे. मात्र त्यास शासनाची मान्यता नसल्याने या व्यावसायिकांविरुद्ध नेहमीच अनधिकृतचे नाव लावून कारवाईची टांगती तलवार ठेवली जात आहे.या व्यवसायामुळे माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांची सोय होत आहे. याकडे शासन दुर्लक्ष करीत आहे . माथेरान येथे दरवर्षी येथे पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. माथेरानमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या हॉटेल व्यवसायाची पर्यटकांना राहण्याची लॉजिंग व्यवस्था दिवसेंदिवस कमी पडू लागली आहे. येथे हॉटेल व्यवसाय वाढीस शासनाचे अनेक नियम आडवे येत असल्याने तसेच येथे मालवाहतुकीचा जटिल प्रश्न असल्याने नवीन हॉटेल निर्मिती होत नाही. सलग लागून आलेल्या सुट्ट्यांमध्ये येथे वाढीव आलेल्या पर्यटकांना राहण्याच्या व्यवस्थेमुळे अनेक वेळा गैरसोयीस सामोरे जावे लागते. काही जण तर परत जाण्यावर धन्यता मानतात जे माथेरानच्या पर्यटनास घातक आहे अशावेळी माथेरानमधील लॉजिंग व्यावसायिक या पर्यटकांना आधार देत असतात. वाजवी दरात खोल्या उपलब्ध होत असल्याने अनेक जण याला प्राथमिकताही देत आहेत, त्यामुळे हा व्यवसाय माथेरानमध्ये भरभराटीस आला आहे. मात्र व्यवसायाला शासन मान्यता देत नसल्याची शोकांतिका येथील व्यावसायिकांची आहे. हा व्यवसाय करणारे महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून दिला जाणारा निवासी आहार योजना हा परवाना घेण्यास तयार असतानाही शासनाकडून त्यास सकारात्मक उत्तर मिळत नसल्याची त्यांची तक्रार आहे, त्यामुळे नगरपालिकेने या लोकांना व्यवसायासाठी परवाने उपलब्ध करून द्यावेत अशी त्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. माथेरानमध्ये वाढत असलेली पर्यटकांची संख्या लक्षात घेता येथे त्यांच्यासाठी अधिकाधिक खोल्या उपलब्ध करून देणे ही शासनाची जबाबदारी असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे व जे परवाना घेऊन व्यवसाय करण्यास तयार आहेत त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. शासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे माथेरानची प्रतिमा मलिन होत आहे .
लॉजिंग व्यवसायाला मान्यता मिळावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:00 AM