घारापुरी लेणी सोमवारी बंदच, शिवदर्शनापासून शिवभक्त वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 04:02 AM2018-08-13T04:02:45+5:302018-08-13T04:02:51+5:30
श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांत शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असताना मात्र, घारापुरी बेटावरील महादेवाची विविध रूपे असलेल्या अतिप्राचीन लेणी पाहण्यासाठी सोमवारीच बंद ठेवले जात आहे.
उरण : श्रावणमासातील प्रत्येक सोमवारी देशभरातील विविध शिवमंदिरांत शिवदर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळत असताना मात्र, घारापुरी बेटावरील महादेवाची विविध रूपे असलेल्या अतिप्राचीन लेणी पाहण्यासाठी सोमवारीच बंद ठेवले जात आहे. यामुळे दररोज बेटावर येणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटक भाविकांना शिवदर्शनाला मुकावे लागत आहे, यामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र असंतोष आहे.
घारापुरी बेटावर कलचुरी घराण्याच्या कारकिर्दीत कोरण्यात आलेली अतिप्राचीन कोरीव लेणी आहेत. काळ्या पाषाणात योगेश्वर शिव, रावणानुग्रहमूर्ती, शिवपार्वती, अर्धनारीनटेश्वर, गंगावतरण शिव, शिवपार्वती विवाह, अंधकारसुरवधमूर्ती, नटराज शिव आणि महेशमूर्ती अशी शिवाची विविध रूपे या कोरीव शिल्पात अद्भुतरीत्या कोरलेली आहेत. कोरीव शिल्पांबरोबरच लेणी परिसरातील विविध गाभाºयांत अतिप्राचीन चार शिवलिंग आहेत. त्यापैकी लेणींच्या पश्चिमेलाही पूर्वाभिमुख शिवमंदिर सुमारे २० चौ. मी. छतापर्यंत भिडलेले आहे.
शिवमंदिराला चारही दिशांना दारे आहेत. या चारही दारांवर विशाल द्वारपाल तैनात आहेत. मंदिरात चौकोनी शाळुंका असून, अगदी तिच्या मधोमध विशाल लेणींचे मुख्य आकर्षण आहे. शिवाची सकल व निष्कंल अशी दोन रूपे एकसमयावच्छेंदे करून फक्त या लेणींतच आढळतात. अशी ही शिवाची अद्भुत शिल्पे पाहण्यासाठी देश-विदेशी पर्यटकांची वर्षभर नेहमीच गर्दी असते. मात्र, वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा लाभलेल्या घारापुरी लेणी प्रत्येक सोमवारी पर्यटकांसाठी बंद ठेवली जातात.
पुरातत्त्व विभागाकडून दुरुस्ती, देखभालीसाठी आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी लेणी बंद ठेवली जातात. सोमवारी येणाºया प्रत्येक महाशिवरात्री उत्सवासाठी पुरातत्त्व विभागाकडून घारापुरी लेणींचे प्रवेशद्वार पर्यटकांसाठी आणि शिवभक्तांसाठी खुले ठेवले जाते. मात्र, श्रावण महिन्यातील सोमवारी बंद ठेवण्यात येत आहे. यामुळे किमान श्रावणातल्या सोमवारी तरी शिवदर्शनासाठी पुरातत्त्व विभागाने लेणींचे प्रवेशद्वार पर्यटक शिवभक्तांसाठी खुले करावे, अशी मागणी शिवसेनेचे उपविभागप्रमुख तथा घारापुरी ग्रा. पं. सरपंच बळीराम ठाकूर यांच्यासह घारापुरी बेटवासीयांनी पुरातत्त्व विभागाकडे केलेली आहे.
सोमवारी लेणी पर्यटक आणि शिवभक्तांसाठी खुली करण्यात यावीत, या मागणीसाठी खा. श्रीरंग बारणे यांनाही साकडे घातले आहे. बेटवासीयांच्या मागणीनंतर याबाबत पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नानंतर वेरुळ लेणी आता सोमवारऐवजी मंगळवारी बंद ठेवली जात आहेत. लोकप्रतिनिधी पुरातत्त्व विभागाच्या मुख्य कार्यालयातील अधिकाºयांकडे प्रयत्न केल्यास घारापुरी लेणींचेही सोमवारी शिवभक्त आणि पर्यटकांना दर्शन होऊ शकते, अशी माहिती घारापुरी लेणींचे केअरटेकर कैलास शिंदे यांनी दिली.
देशी-विदेशी पर्यटकांची निराशा
सोमवारी लेणी पर्यटक आणि शिवभक्तांसाठी खुली करण्यात यावीत, या मागणीसाठी खा. श्रीरंग बारणे यांनाही शिवभक्त तसेच घारापुरीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी साकडे घातले आहे. बेटवासीयांच्या मागणीनंतर याबाबत पुरातत्त्व विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शिवभक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.