भरावामुळे घारापुरी बेटाची धूप
By admin | Published: December 27, 2016 02:41 AM2016-12-27T02:41:59+5:302016-12-27T02:41:59+5:30
जेएनपीटी बंदरातील भरावांच्या कामांमुळे समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील किनारपट्टीचे बांध
- मधुकर ठाकूर, उरण
जेएनपीटी बंदरातील भरावांच्या कामांमुळे समुद्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावरील किनारपट्टीचे बांध बंदिस्ती, संरक्षक तट सागरी लाटांमुळे पार उद्ध्वस्त झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी बेटालगत संरक्षक भिंत बांधण्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर संरक्षक भिंतीचे काम झालेच नसल्याने बेटावरील चहुबाजूंच्या सागरी किनाऱ्यांची मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. घारापुरी बेटावर समुद्राचे पाणी किनारपट्टीची पातळी सोडून १० मीटर आत घुसू लागले आहे. रहदारीचे रस्तेही पाण्याखाली जाऊ लागले आहेत. बेटाच्या अस्तित्वालाच गंभीर धोका निर्माण झाल्याची तक्रार शिवसेनेचे उपविभाग प्रमुख तथा घारापुरी ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
जेएनपीटी बंदराची उभारणी १९८९ करण्यात आली. तेव्हापासून बंदराचा विकासाच्या नावाखाली आणखी दोन बंदरे खासगीकरणातून उभारण्यात आली आहेत. त्यानंतर बंदरातील सर्वाधिक लांबीचे तसेच क्षमतेचे चौथे बंदर उभारण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. विविध बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणात दगड, मातीचे भराव के ले आहेत. समुद्रात होत असलेल्या प्रचंड भरावामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी सातत्याने वाढत आहे. परिणामी समुद्राचे पाणी किनाऱ्यावरील बांध बंदिस्ती, संरक्षक तट उद्ध्वस्त करीत बेटांवरील गावांच्या दिशेने वाढू लागले आहे. जेएनपीटीच्याकामामुळे पर्यावरणाच्या होत असलेल्या हानीबाबत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ नवी मुंबई यांनी २३ जानेवारी २०१७ रोजी जनसुनावणी घेण्याचे जाहीर केले आहे. या जनसुनावणीदरम्यान प्रकल्प आणि पर्यावरणाबाबत तक्रारी, सूचना, टीका टिप्पणीवर चर्चा केली जाणार आहे. जनसुनावणीला अनुसरून शिवसेनेचे उपविभाग प्रमुख तथा घारापुरी ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे.
पर्यटक आणि नागरिकांसाठी रहदारीसाठी असलेले प्रमुख रस्तेही इतिहासजमा होण्याच्या स्थितीत आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास आणि त्याकडे शासन, जेएनपीटीने वेळीच लक्ष दिल्यास बेटावरील रहदारीसाठी उरलेले रस्तेही समुद्राच्या पाण्यात वाहून जाण्याची भीती बळीराम ठाकूर यांनी तक्रारीतून व्यक्त केली आहे.
जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर देश-विदेशातून वर्षभर लाखो पर्यटक ऐतिहासिक लेणी पाहण्यासाठी येतात. मात्र अशा या जागतिक दर्जा लाभलेल्या बेटासभोवार असलेल्या सागरी किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप होवून समुद्राच्या पातळीत प्रचंड वाढ झाली आहे. या गंभीर प्रकाराकडे शासनानेही दुर्लक्षच चालविलेले आहे. जेएनपीटीच्या विविध बंदराच्या उभारणीसाठी समुद्रात सातत्याने होणाऱ्या प्रचंड भरावामुळे सागरी किनाऱ्यांची होणारी धूप, समुद्राच्या सातत्याने वाढणाऱ्या पाण्याच्या पातळीमुळे बेटाला होऊ पाहणाऱ्या धोक्याबाबत जेएनपीटीने तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी घारापुरी ग्रा. पं. ने केली होती.
बेटावर समुद्रातून येणारा कचरा, प्लास्टिक आणि तेलतवंगामुळे सागरी किनारा पार काळवंडला आहे. तसेच दुर्मीळ खारफुटीची झाडेही नष्ट होत चालली आहेत. सातत्याने येणाऱ्या कचऱ्यामुळे किनारपट्टी दुर्गंधीयुक्त बनत चालली आहे. त्यामुळे मासेमारी व्यवसायही अडचणीत आला आहे. बेटाच्या होत चाललेल्या विद्रूपीकरणाचे विदेशीपर्यटक चित्रीकरण करीत आहेत. त्यामुळे जागतिक स्तरावरील बेटाचे नाव खराब होत चालले आहे. याकडेही बळीराम ठाकूर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या तक्रारीतून लक्ष वेधले आहे.
जेएनपीटीच्या चॅनेलची खोली वाढविणे, चौथे बंदर उभारण्याच्या कामासाठी सुरू असलेल्या भरावामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. सागराच्या प्रचंड लाटांच्या तडाख्यामुळे घारापुरी बेटावरील शेतबंदर, मोरा बंदर, राजबंदर या तिन्ही गावांवर असलेल्या किनारपट्टीची मोठ्या प्रमाणात धूप झाली आहे. सर्वाधिक राजबंदर जेट्टी ते स्मशानभूमीपर्यंतच्या रस्त्याची, समुद्राच्या लाटांच्या तडाख्याने पार दुर्दशा झाली आहे. जमिनीच्या झालेल्या प्रचंड धूपमुळे पार खचून गेला आहे.
- बळीराम ठाकूर,
ग्रामपंचायत सदस्य, घारापुरी